क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा बघायला मिळाला युवराजचा रुद्राअवतार; कर्णधार सचिनची जबरदस्त ६० धावांची खेळी
इंडिया लेजेन्ड्स विरुद्ध साऊथ आफ्रिका लेजेन्ड्स यांच्यात झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या १३व्या मॅचमध्ये इंडिया लेजेन्ड्सनी साऊथ आफ्रिका लेजेन्ड्सवर ५६ धावांनी विजय मिळवला. साऊथ आफ्रिका लेजेन्ड्सनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंडिया लेजेन्ड्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरला चांगली सुरुवात मिळाली. दुसऱ्या बाजूने सेहवाग लवकर बाद झाला. सचिन आणि बद्रीनाथमध्ये ९५ धावांची भागीदारी झाली. सचिनने सर्वाधिक ३७ चेंडूमध्येमध्ये ६० धावा केल्या. त्यात त्याने १ षटकार व ९ चौकार मारले. बद्रीनाथने ४२ धावा केल्या. क्रिकेटप्रेमींना युवराजचा रुद्रा अवतार पुन्हा एकदा बघायला मिळाला. युवराजने २२ चेंडूत ५२ धावा केल्या. ६ षटकार व २ चौकारसोबत युवराजने १८ व्या ओव्हरमध्ये सलग ४ चेंडूत ४ षटकार ठोकत सर्वांना २००७ टी-२० वर्ल्डकपची आठवण करून दिली. इंडिया लेजेन्ड्सने साऊथ आफ्रिका लेजेन्ड्सला २०५ धावांचे लक्ष दिले होते. या लक्षाचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिका लेजेन्ड्सची सुरुवात चांगली झाली. पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी त्यांनी केली, परंतु यानंतर सलग त्यांच्या विकेट्स पडत गेल्या. इंडिया लेजेन्ड्सकडून युसूफ पठाणने ३, युवराजने २ तर प्रज्ञान ओझा आणि विनय कुमारने १-१ विकेट्स घेतल्या. युवराजच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.