स्पेशल स्टोरीज

मासिक पाळी : धर्मांधता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

महिला दिन विशेष

कोणतीही गोष्ट स्वीकारण्या आधी त्यामागे आपला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सा असावी लागते. आंधळेपणाने किंवा चालत आलेल्या परंपरा आहेत,रूढी आहेत म्हणून आपण त्यांचा स्वीकार  हा निव्वळ मूर्खपणा आहे. मासिक पाळी किंवा ज्याला आपण Menstruation म्हणतो , त्यातसुद्धा बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत. ज्या आजही बऱ्याच महिला स्वीकारताना दिसतात. 

              पुरुषांचे आणि महिलांचे शरीर यांत खूप फरक आहे. महिलांचे शरीर अत्यंत गुंतागुंतीचे असून नवीन पिढीची सुरुवात महिलाच करू शकते. महिलांची पुनरुत्पादक प्रणाली गर्भधारणा होण्यासाठी आणि त्यातून बाळाला जन्म देण्यासाठी आहे. मासिक पाळी येणे हा त्यातलाच एक गुणधर्म. मासिक पाळीची सुरुवात वयाच्या 12-13 वर्षी होते आणि प्रक्रियेला रजोदर्शन (Menarche) असे म्हणतात. दर महिन्याला होणाऱ्या रक्तस्रावाबरोबर यात विफल बीज देखील असते ज्यामध्ये बाळाला जन्म देण्याची ताकद आहे. पुढे 40 ते 45 वर्षापर्यंत मासिक पाळी सुरू राहते. मासिक पाळी या वयानंतर येत नाही आणि या प्रक्रियेला रजोदर्शन (Menapause) असे म्हणतात. हा सर्व नैसर्गिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. विज्ञान हा एकमेव मार्ग आहे जो घडणाऱ्या गोष्टींचे पुरावे देतो.                 

मासिक  पाळीबद्दल समाजात अजूनही बऱ्याच अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. पाळीदरम्यान स्त्रियांना संपूर्ण रीतीने आराम देणे हा त्यामागचा उद्देश सांगितला जातो.महिलांनी पाळीदरम्यान काहीही काम करू नये, कशालाही हात लावू नये असं सांगितलं जातं ही गोष्ट आरामाकारता सांगितली जाते हे मान्य आहे पण मग या काळात स्त्रीला अपवित्र का मानले जाते? याच उत्तर अस दिल जात की मासिक पाळीदरम्यान तिचं रक्त अशुद्ध असत वगैरे वगैरे. मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्राव हा धमन्यांतून(Artery) होत असतो. धमन्यांमध्ये वाहणारा  रक्तप्रवाह शुद्ध रक्ताचा असतो. हे सर्व खरं असताना महिला या काळात अपवित्र कशा होतात? स्त्रियांमध्ये ज्याप्रमाणे विफल बीज पाळीच्या स्वरूपात बाहेर पडते त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये देखिल शुक्राणू बाहेर पडतात. या काळात स्त्रिया अपवित्र ठरतात तर मग पुरुष का ठरत नाहीत? याच कारण आहे पुरुषी मानसिकता आणि ही फक्त पुरुषांमध्येच आहे असही नाही.       

जेव्हा एका 12 ते 13 वर्ष्याच्या मुलीला पहिल्यांदा पाळी येते तेव्हा घरातल्या महिलांचंच नाही तर पुरुष मंडळी च देखील काम आहे की मुलीला याबद्दल माहिती देणे, तिच्या शंका दूर करणे. अशा काळात त्यांना समजून घेण्याऐवजी घराबाहेर ठेवण, त्यांचे कपडे त्यांनाच धुवायला देणं, तिच्याशी किळसवाण वागणं हे कितपत योग्य आहे ? महिलांना फक्त एक उपभोगण्याची वस्तू समजलं जातं ही इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीची मानसिकता. म्हणून पाळीदरम्यान महिलांना किळसवाण्या नजरेने पाहिलं जातं.       

धर्मग्रंथातील पौराणिक कथा काय सांगते, एकदा गुरू बृहस्पती इंद्रदेवावर नाराज झाला ज्याचा फायदा असुरांनी देवलोकवर आक्रमण करण्यासाठी केला. झालेल्या आक्रमणाने इंद्रदेवाने तेथून पळ काढला व स्वतःला वाचवत ब्रम्हदेवकडे गेला. यावर त्याने ब्रम्हदेवाला उपाय विचारला, त्याने सांगितले की तुला स्वर्गलोक परत हवा असेल तर मग तुला एका ब्रम्हज्ञानीची सेवा करावी लागेल. ब्रम्हदेवाने सांगितल्या प्रमाणे इंद्रदेवाने ब्रम्हज्ञानीची सेवा करण्यास सुरू केले. पण इंद्रदेवाला माहीत नव्हते की ब्रम्हज्ञानीची आई ही असुर आहे या कारणामुळे त्याला असुर जास्त जवळचे होते. इंद्राचे हवन करण्याकरिता लागणारे सामान तो जाऊन असुरांना देत असे हे कळताच इंद्रदेवाने ब्रम्हज्ञानीची हत्या केली. ब्रम्हहत्येच्या या पापातून मुक्त होण्याकरिता तो विष्णू कडे गेला. विष्णूने त्याला सांगितले की तुझे हे पाप तुला 1/4 करून वृक्ष, पाणी, भूमी आणि स्त्रियांमध्ये वाटाव लागेल व सोबत एक एक वरदानही द्यावं लागेल विष्णूने सांगितल्याप्रमाणे इंद्रदेव वृक्षाकडे गेला आपल्या पापाचा 1/4 भाग देऊन त्याने वरदान दिले की मेल्यानंतर वृक्ष स्वतःला पुनरुज्जीवित करू शकतील. पुढे त्याने पाण्याला त्याच्या पापाचा भाग देत वरदान दिले की पाणी कशासही पवित्र करू शकेल.          

 त्यानंतर त्याने भूमीला त्याच्या पापाचा भाग देत वरदान दिले की तिला झालेल्या जखमा/भेगा आपोआप भरतील. उरलेल्या पापाचा भाग इंद्राने स्त्रियांना दिला व सोबत वरदान दिले की कामाचा आनंद स्त्रीला जास्त घेता येईल. इंद्राने दिलेल्या पापाचा भाग म्हणजे स्त्रियांना येणारी मासिक पाळी असे या कथेत सांगितले आहे. कदाचित इंद्रदेवाने दिलेल्या या पापामुळे स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान अपवित्र मानले जात असावे. धर्मग्रंथातील ही पौराणिक कथा आहे. ही जर एक कथा आहे तर मग कोणताही विचार तर्क दृष्टिकोन समोर न ठेवता स्त्रिया ह्या अपवित्र असतात हे कितपत खर आहे ?       

मासिक पाळी ही पुनरुत्पादनातील एक प्रक्रिया आहे आणि ही माणसांतच नाही तर माकडाच्या काही जातीतील Tarsiers आणि Chimpanzee या मादांमध्येदेखील होते. मग यांना विष्णूने केले अपवित्र इंद्रदेवाने, ब्रह्मदेवाने की अजून कोणी ? तथ्य नसणाऱ्या गोष्टी माणूस लवकर अवगत करत असतो कारण विचार करण्याचे श्रम घ्यायला लागत नाहीत.           इंद्रदेवाने पाप दिल्यानंतर स्त्रियांमध्ये मासिक पाळी सुरू झाली तर मग स्वतः इंद्रदेव कसा जन्माला आला ? बाकी सर्व देवलोकातील देव, अप्सरा आणि असुर यांनी कुठून आणि कसा जन्म घेतला असावा ? या पौराणिक कथा सांगतात की ब्रम्हाचा जन्म विष्णूच्या नाभिवारील कमळाने झाला, रुद्रदेवाचा जन्म ब्रम्हदेवाच्या कपाळातून झाला, त्या काळातील विज्ञान इतकेच पुढे होते तर मग आम्हीसुद्धा पुढे जायला हवे होते आणि Planaria सारखे पुनर्निर्माण करायला पाहिजे होते. महिलांना मासिक पाळीद्वारे पीडा देण्याची काही एक गरज नव्हती. स्त्री आणि पुरुष यांच्या मिलनातून होणाऱ्या अपत्याची गरजच नव्हती.         

 देवांचा देव महादेव अर्धनारीनटेश्वर यांच्या प्रेमात एक मुलगी पडली ती होती सती. सांगण्यात असे येते की ती दुर्गादेवीचा अवतार होती. तिचा जन्म हा महादेव तिच्या पोटी परत यावे म्हणून झाला. महादेवाच्या प्रेमात पडल्याची बातमी तिने तिच्या वडिलांना दिली व लग्न करायचा निर्णय सांगितला पण हे त्यांना मान्य नव्हते. सतीचे वडील एक यज्ञ करत होते त्यांची परवानगी नसताना सती तिथे गेली आणि त्यामुळे यज्ञात बाधा आली. या गोष्टीचा तिच्या वडिलांना चांगलाच राग आला व महादेवाला खूप काही वाईट बोलले. महादेवाला बोलल्याने सतीला राग आला व रागाच्या भरात तीने यज्ञाच्या अग्नीत स्वतःला जाळून घेतले. महादेवाला कळताच ते तेथे आले त्यांनी सतीला उचलले व तिला घेऊन तांडव केला. तिला घेऊन जात असताना महादेवाला काममोहात अडकवले म्हणून विष्णूने त्याच्या चक्राने सतीचे एकावन्न तुकडे केले. तिच्या या शरीराचे तुकडे जिथे जिथे पडले तिथे मंदिरे बांधण्यात आली.   

          कामाख्या नावाचे एक मंदिर आहे जे आसाम ची राजधानी दिसपूर जवळ गुवाहाटी पासून दूर कामाख्या नावाच्या गावात आहे. या गावापासून दूर निलांचल पर्वतावर हे मंदीर आहे. सतीच्या शरीराच्या तुकडयांपैकी योनीचा भाग इथे पडला होता आणि म्हणून इथे मंदिर बांधण्यात आले. देवीची एक मूर्ती असून दगडाच्या योनीचे शिल्प इथे आहे आणि त्यातून पाण्याचा पाझर येतो.          

नवल या गोष्टीचे आहे की या दगडाच्या योनीला मासिक पाळी येते म्हणे आणि म्हणून महिन्यातील तीन दिवस हे मंदिर बंद असते. या दगडाला आलेली मासिक पाळी, तिचा रक्तस्त्राव हा ब्रम्हनदीमध्ये दिसतो म्हणून तिचे पाणी लाल होते. एक मोठा वस्त्र या रक्तस्त्रावात भिजवला जातो याला अंबूबाची वस्त्र असे संबोधले जाते.             ज्या गोष्टीला जीव नाही तिच्यात रक्त येणार कुठून ? विष्णूला तिचे म्हणजे सतीचे तुकडे टाकायचेच होते तर पूर्ण पृथ्वी त्याचीच होटी कुठेही टाकायला पाहिजे होते.सती तेव्हा तरुण होती तर मग आतापर्यंत रजोनिवृत्ती होऊन रक्तस्राव थांबायला पाहिजे होता.         

 मंदिराच्या ठिकाणी बोकड्याचा बळी दिला जातो देवीला प्रसन्न करण्यासाठी. अघोरी लोक जे तंत्र मंत्र करतात ते इथे बहुसंख्येने आढळतात. अर्थात इथे मोठ्या प्रमाणात लोकांचा धंदा होतो. अघोरी करतात इथले पुजारी करतात. जिथे मासिक पाळी असताना स्त्रियांना अपवित्र समजले जाते तिथे देवीला का नाही ?         

कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही विज्ञानाने होते आणि शेवटसुद्धा !  थोतांडावर विश्वास ठेवण्यापेक्षा चिकित्सा करता आली पाहिजे. अंधश्रद्धा ठेवण्यात काहीच नाही कारण जेथे भय, भीती आहे तेथे अंधश्रद्धा आलीच. चिकित्सा करणे गरजेचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. लुटणारे लुटून जातात. आपण जागरूक होणे गरजेचे आहे.

ऋषीकेश खंडाळे

Share and Enjoy !

Shares

2 thoughts on “मासिक पाळी : धर्मांधता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

  • Prakashdarpan

    अप्रतिम लिहिलंय . तथ्य मांडलं आहे .शुभेच्छा

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *