एकदिवसीय रँकिंगमध्ये कोहली पहिल्या तर रोहित तिसऱ्या स्थानी
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली टी 20 रँकिंगमध्ये फटका बसला असला तरी एकदिवसीय सामन्यांच्या रँकिंगमध्ये कोहली नंबर वनच ठरला आहे. कोहलीन इंग्लंड विरोधाच्या वनडे सीरिजमधील पहिल्या दोन सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्याने पहिल्या दोन सामन्यात 56 आणि 66 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याचं एकदिवसीय रँकिंगमधील पहिला नंबर अबाधित आहे. विशेष म्हणजे त्याचे आता 870 गुण झाले आहेत. विराट कोहली पाठोपाठ टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यांच्या रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर सध्या पाकिस्तानचा बाबर आजम आहे. दरम्यान, इंग्लंड विरोधातील सामन्यात चांगली कामगिरी केल्याने के एल राहुल याला देखील चांगला फायदा झाला आहे. के एल राहुल हा 31 व्या स्थानावरुन थेट 27 नंबरवर आला आहे. तर हार्दिक पांड्या 42 व्या स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे पांड्याची ही वनडे करिअरमधील बेस्ट रँकिंग आहे. दुसरीकडे रिषभ पंतनेही टॉप 100 खेळाडूंच्या यादीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. इंग्लंड विरोधाच्या सीरिजमधील शेवटच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 42 धावा देवून 3 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीचा त्याला चांगला फायदा झालाय. भुवनेश्वर आता थेट 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे 2017 मध्ये तो 10 व्या क्रमांकावर आला होता. त्यानंतर त्याचा नंबर खाली घसरला होता. मात्र, चार वर्षांनी पुन्हा तो 11 व्या स्थानावर पोहोचला आहे.