पॉलिटीक्स

रूपं बदलणारा विषाणू आणि स्वरूप बदलणारी गुन्हेगारी यांच्याशी लढण्याचे पोलीसांचे शौर्य गौरवास्पद-उद्धव ठाकरे

महाराष्ट्र पोलीस दलाला कर्तव्यदक्षतेचा समृद्ध वारसा लाभला आहे. आजच्या कोरोना संकटातही पोलीसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेत कुठलीही तडजोड केलेली नाही. पदोपदी रूपं बदलणारा कोरोनाचा विषाणू आणि त्याच गतीने क्षणोक्षणी स्वरूप बदलणारी गुन्हेगारी ही महाराष्ट्र पोलीस दलासमोरची आजची मोठी आव्हाने आहेत, अशाही परिस्थितीत या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी पोलिसांनी दाखवलेले धैर्य व शौर्य हे गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

आज येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक ११८ व्या सत्राच्या च्या दीक्षांत संचलन समारंभाच्या प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे तर पोलीस महासंचालक रजनीश शेठ, अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजयकुमार,नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय् , महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे, विशेष नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील प्रभारी सहसंचालक तथा उप संचालक ( प्रशिक्षण ), गौरव सिंग, उपसंचालक ( प्रशासन ), शिरीष सरदेशपांडे उपसंचालक ( सेवांतर्गत प्रशिक्षण ), श्काकासाहेब डोळे, सहा.संचालक ( कवायत ) आणि महाराष्ट्र पोलीस अभिजीत पाटील तसेच प्रबोधिनीमधील सर्व सहायक संचालक , वैद्यकीय अधिकारी विधी निदेशक, सहा कवायत निदेशक प्रत्यक्ष उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कर्तव्यदक्ष व धैर्यवान पोलीसांची दीर्घ परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अशा पोलीसदलात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीसांचे मी अभिनंदन करतो. तसेच आज पोलीस दलासमोर दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या शत्रुंचे मोठे आव्हान असून एकीकडे आमचे पोलीस गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढताना दिसतात तर दुसरीकडे हेच पोलीस कोरोना संकटाचा सामना निकराने करताना दिसतात. दिसणाऱ्या शत्रूवर आजवर आपण तुटून पडतो पण आज पण न दिसणाऱ्या कोरोनासारख्या शत्रुशीही पोलीस जिवाची बाजी लावून लढताहेत, याबद्दल पोलीसांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, प्रसंगावधानता हा अत्यंत महत्वाचा गुण पोलीसांच्या अंगी आवश्यक असतो. कधीकधी एखादी कारवाई केली तर का केली म्हणून प्रश्न उपस्थित केले जातात तर नाही केली तरी का नाही केली? याद्दबद्दलही प्रश्न उपस्थित केले जातात, अशा वेळी ‘होश आणि जोश’ यांचे तारतम्य ठेवून निर्णय घ्यायचे असतात. माणसाची इच्छाशक्ती हा अत्यंत महत्वाचा गुण असतो आणि ही इच्छाशक्तीच आपली स्वप्न निश्चित करत असते. आज पोलीस अकादमीतून बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी पोलीस दलात जायचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं ही जीवनातली फार मोठी उपलब्धी आहे, अशी स्वप्न पहाययला मोठी दुर्दम्य इच्छाशक्ती लागते, ती पोलीस दलात येणाऱ्या प्रत्येकाच्या ठायी असते. भविष्यात तुमची स्वप्न ही केवळ तुमची स्वप्न नाहीत तर ती संपूर्ण महाराष्ट्राची स्वप्न आहेत. म्हणून हे सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवतील असा आशावादही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *