जपानच्या तज्ज्ञांची ऑलिम्पिक रद्द करण्याची मागणी
टोकियोमध्ये कोरोनाचा वाढता धोका
ऑलिम्पिक ज्योतीचा प्रवास सुरू झाला तसेच ऑलिम्पिकची तयारी अंतिम टप्प्यात आहे.अशातच जपानी वैद्यकीय तज्ज्ञांनी ह्या वर्षाची ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली आहे. टोकियोमध्ये वाढत्या कोरोना संसर्गामुळे स्पर्धा घेणे धोकादायक ठरेल असा इशारा जपानी वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
ऑलिम्पिकपूर्वी जपानमधील ५०-६० टक्के लोकांचे लसिकरण होणे अपेक्षित होते;परंतु ४ महिन्यांपर्यंत येऊन ठेपलेल्या या स्पर्धेच्या आधी १ टक्के नागरिकांचेही लसीकरण झाले नाही.
अशात ऑलिम्पिक २३ जुलैला सुरू होईल आणि त्याआधी इतक्या लोकांचे लासीकरण शक्य दिसत नाही. एका स्थानिक अहवालानुसार परदेशी प्रवाश्यांना बंदी लावल्यानंतरही ९०,००० लोक जपानमध्ये प्रवेश करतील आणि त्यामुळे कोरोना संसर्ग वाढेल अशी लोकांना भीती आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार जपानी लोक ऑलिम्पिक करण्यास विरोध करत आहेत. परंतु ऑलिम्पिकच्या नियोजनासाठी जपान सरकारने १५.४ अब्ज डॉलर खर्च केले आहेत.अर्थात हा खर्च दुप्पट झाल्याचे काहींचे म्हणणे आहे कारण ह्या स्पर्धेसाठी जैवसुरक्षित वातावरण तयार करावे लागणार आहे.
त्यामुळे आयोजांकनी विश्वासाने सांगितले आहे की स्पर्धा होणारच.
सध्या जपान मध्ये रोज ३५० लोकांना कोरोनाची लागण होत आहे आणि मे महिन्यात ही स्थिती अजुन वाढेल अशी शंका वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे देशात टाळेबंदी सुद्धा लागू शकते आणि त्याचा परिणाम ऑलिम्पिकवर नक्कीच होईल त्यांचे मत आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परदेशी प्रेक्षकांना स्पर्धा टोकियो मध्ये येऊन बघता येणार नाही असा निर्णय आयोजकांनी केला आहे. पण त्या परदेशी नागरिकांना धक्का लागू शकतो कारण टोकियो ऑलिम्पिक चे तिकीट खरेदी केलेल्या परदेशी प्रेक्षकांना अर्धेच पैसे परत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.