तंत्रज्ञानपॉलिटीक्समहाराष्ट्रसायन्स अँड टेक्नालॉजी

हसत खेळत शिक्षणाचे दरवाजे शिक्षा सेतू उघडणार

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 35 शासकीय आश्रमशाळेत सुरू करण्यात आलेल्या ‘शिक्षा सेतू’ प्रकल्पाच्या माध्यमातून आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना सहजसोप्या पद्धतीने भाषा आणि गणित संबंधी नवी माहिती उपलब्ध करून देण्यात येत असून विद्यार्थ्यांना मुलभूत संगणकीय ज्ञानही प्राप्त होत आहे.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फाऊंडेशन, युनिसेफ आणि माईंडस्पार्कच्या सहकार्याने नंदुरबार प्रकल्पातील 28 आणि तळोदा प्रकल्पातील 7 आश्रमशाळांमधून पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षकांना माहिती, तंत्रज्ञान आणि संवाद विषयक प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

माईंडस्पार्क लॅबसाठी आवश्यक विद्युत जोडणी, 725 संगणक टेबल, बसण्यासाठी 1553 स्टुल्स, राऊटर, युपीएस, एलईडी स्क्रीन सह 35 सर्व्हर संगणक, विद्यार्थ्यांसाठी 759 लॅपटॉप, 46 टॅबलेट, 1610 हेडफोन आदी साहित्याची सुविधा प्रत्येक ठिकाणी करण्यात आली आहे. अध्ययनासाठी आवश्यक सॉफ्टवेअरदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रकल्पाबाबत प्रशिक्षण आणि संचलनासाठी आवश्यक मनुष्यबळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रत्येक आश्रमशाळेसाठी स्वतंत्र आयडी तयार करण्यात आला आहे, तसेच 12 हजार 732 विद्यार्थ्यांचे आयडी आणि पासवर्ड देखील तयार करण्यात आले आहेत आणि 300 शिक्षक या प्रणालीशी जोडले गेले आहे.  सर्व शिक्षकांचे प्रशिक्षणही  घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनादेखील याबाबतची माहिती देण्यात आली आहे. विषयक शिक्षक विद्यार्थ्यांना लॅबमध्ये घेऊन जातात.  या ठिकाणी विद्यार्थी आपल्या पासवर्डच्या माध्यमातून प्रणालीत प्रवेश करतात आणि स्वाध्यायासह विविध प्रश्नांचा समावेश असलेल्या 8 प्रकारच्या ज्ञानवर्धक खेळात सहभागी होतात.

माऊस आणि कळफलकाचा उपयोग, कळफलकाच्या माध्यमातून लिहिणे, लॅपटॉपचा वापर करणे याबाबतची माहिती त्यांना देण्यात येते. प्रत्येक वर्षाच्या सुरूवातीला मराठी, गणित आणि इंग्रजी विषयासाठी विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येते आणि त्यावरून त्याचा स्तर लक्षात घेतला जातो. चाचणीच्या आधारे प्रत्येक विद्यार्थी आपल्या गरजेनुसार माईंडस्पार्कद्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. या संपूर्ण प्रक्रीयेकडे शिक्षकांचे लक्ष असते.

लॅबचा अधिक कार्यक्षमपणे वापर करण्यासाठी वर्षातून दोनदा शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी शिक्षण मित्रांची नियुक्ती संबंधित संस्थेतर्फे करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे संनियंत्रण प्रकल्प कार्यालयाद्वारे नियमितपणे करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ज्ञानाचा स्तर वाढविण्यासाठी, त्यांना तंत्रज्ञान विषयक माहिती देण्यासाठी, नाविन्याचा शोध घेण्याची प्रवृत्ती त्यांच्या निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणातून मिळणारा आनंद अध्ययनासाठी प्रेरक ठरत आहे.

अशी आहे प्रणाली-

* विद्यार्थी स्वत:कडील लॉगईन व पासवर्डने प्रणाली सुरू करतात.

* प्रणालीत दिलेले स्वाध्याय सोडवितात.

* सोडविलेल्या उदाहरणावरून सर्व्हर संगणकावर  त्यांचा बौद्धीक स्तर शिक्षकांना लक्षात येतो.

* प्रणालीतून बाहेर पडताना सोडविलेल्या प्रश्नांचे गुणांकनही कळते.

* विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी शिक्षकांना कळत  असल्याने त्यांना व्यक्तिश: मार्गदर्शन करता येते.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *