संजय राठोड यांच्यावर शरद पवार नाराज ..
मंत्री पद धोक्यात ?
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचं समजतं. शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राठोड यांच्याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.राठाेडांचे शक्तिप्रदर्शन, पण नियमांचे उल्लंघन; आरोप खोटे असल्याचा पाेहरादेवीत दावासंजय राठोड यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं. संजय राठोड यांच्यावरील आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचं पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
१५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राठोड यांनी काल पोहरादेवीला भेट दिली. त्यावेळी तिथे हजारो लोक उपस्थित होते. राठोड यांच्याकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनावर मुख्यमंत्रीदेखील नाराज असल्याचं समजतं.
पूजा प्रकरणाच्या आड समाजात बदनामी करण्याचे घाणेरडे राजकारण खेळून तीस वर्षांचे राजकीय जीवन संपवण्याचा घाट घातला जात असल्याचे राठोड यांनी सांगितले. विराेधकांकडून करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून त्यात सर्व बाबी स्पष्ट होतील, असे सांगतानाच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, अशी विनंती त्यांनी केली.