स्पेशल स्टोरीज

पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत – सावित्रीबाई फुले

“सावित्रीबाई फुले : एक युग स्त्री सार्वजनिक कार्यासाठी बाहेर पडलेली भारतीय पहिली स्त्री स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली एकोणिसाव्या शतकातील एकमेव  स्त्री, स्त्री-मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या”  -डॉ. मा.प. मंगुळकर            

भारतीय महिलांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये समान संधी व न्याय देण्याकरिता जे आंदोलन  भारत देशामध्ये उभं राहिलं. त्या आंदोलनास ‘स्त्रीवाद’ असे म्हणतात. पुरुषसत्ताक मानसिकतेला छेद देण्याकरिता व स्त्री पुरुष समानता भारतीय समाजात प्रस्थापित करण्याकरता स्त्रीवादी विचारवंत हे नेहमीच आग्रही असतात. प्रारंभीच्या काळात स्त्रीवादाची सुरुवात पश्चिमी देशात झाली. व त्यानंतर जागतिक स्तरावर हळूहळू तिचा विस्तार होऊन पुढे तो चर्चेचा गंभीर व मूलभूत विषय बनला.              

१८४८ साली जागतिक स्तरावर अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या अमेरिकेमध्ये याच काळात स्त्रीवादी चळवळीचा जन्म झाला, मानवी हक्कांसाठी फ्रान्स मध्ये क्रांती झाली, कार्ल मार्क्स यांचा ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ प्रकाशित झाला. आणि याच काळात 1 जानेवारी १८४८ ला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्याने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.          

“ढोल, गवार, शूद्र, पशु, और नारी, 

सकल ताडन के अधिकारी”


          ढोल, अशिक्षित, शूद्र, पशु आणि महिलांना फक्त फटक्यांची भाषा समजते किंवा फटके दिले पाहिजे एवढाच त्यांचा अधिकार आहे अशी मानणारी ब्राह्मणी व्यवस्था त्याकाळात होती. ज्या काळात स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच सीमित ठेवलं जायचं स्त्रियांना फक्त आणि फक्त उपभोगाची वस्तू म्हणून बघितलं जायचं, त्याकाळात महात्मा फुले हे स्वतः शिकले आणि सावित्रीबाई यांना देखील शिकवलं आणि सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या आणि येथील मनुवादी व्यवस्थेला या ऐतिहासिक घटनेने जबरदस्त चपराक दिली.

 महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मूलबाळ होत नसल्या कारणाने ज्योतिबा रावांच्या कुटुंबातील मंडळी त्यांच्याकडे दुसरा लग्नाकरिता तगादा लावला परंतु, वेळोवेळी नकार देऊन सुद्धा त्यांचे कुटुंबीय ऐकत नसत. त्यामुळे हे प्रकरण कायमचं मिटवण्याकरिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी लग्नाकरिता मुलगी बघण्यास होकार दिला. मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होणारच तेवढ्यात महात्मा फुलेंनी बोलावलेले काही मंडळी तेथे आली सर्वजण अवाक् झाले की हे कोण? तेव्हा महात्मा फुले सांगायला लागले, “की हा मुलगा सावित्रीला बघण्याकरिता आला आहे जर माझे दुसरे लग्न होऊ शकते तर सावित्री चे सुद्धा दुसरे लग्न करायला हवे आणि यातूनच खर्‍या अर्थाने कळेल की नेमकं मूळ बाळ कुणामुळे होत नाही.” महात्मा फुलेंचे हे शब्द ऐकून सर्वजण बिथरले. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिराव फुले स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करत होते आणि याच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या तालमीत सावित्रीबाई फुले या तावून सुलाखून निघालेल्या होत्या, सुरुवातीला जोतीरावांची विद्यार्थिनी पुढे कवियत्री, शिक्षिका, मुख्याध्यापिका, शिक्षणतज्ञ, नेता, स्त्रीवादी विचारवंत असा त्यांचा प्रवास ऐतिहासिक होता, सावित्रीबाई फुले यांची प्रत्येक कृती ब्राह्मणी पुरुषसत्ताक व्यवस्थेला आव्हान देणारी होती.       

भारतीय समाजातील पुरुष सत्ताक ही मानसिकता व व्यवस्था पूर्णपणे ब्राह्मण्यवादावर व सनातनी विचारांवर अवलंबून आहे. आणि याच मनुवादी आणि ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात सावित्रीबाई फुले यांनी लढा उभारला आणि या पुरुषसत्ताक ब्राह्मणी मनुवादी व्यवस्थेला छेद देण्याकरिता शिक्षणाचा मार्ग सांगितला.सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका,शिक्षण तज्ञ व स्त्रीवादी विचारवंत म्हणून पुढे आल्या. हा तो काळ होता ज्या काळात मनुवादी विचारांचा भारतीय समाजावर जबरदस्त पगडा होता मोठ्या प्रमाणावर जातिभेद आणि विषमता पाळली जायची. स्त्री पुरुष समानता तर दूरच परंतु, पुरूषा – पुरुषांमध्येही जातीभेदावर विषमता असणारा हा तो काळ होता.     

‘शूद्रांना सांगण्या जोगा मार्ग हा, शिक्षण आणि मनुष्यत्व पशुत्व वाटते पहा”.असे एका कवितेत सावित्रीबाईंनी म्हटले होते. त्यांच्या ‘काव्य फुले’ हा 1854 साली प्रकाशित झालेला कवितासंग्रह ज्ञानार्जन ज्ञान निर्मिती आणि ज्ञानप्रसार यांनाच वाहिलेला आहे. 

 “शूद्रांना सांगण्या जोगा शिक्षण मार्ग हा, शिक्षण आणि मनुष्यत्व पशुत्व वाटते पहा|”


        असे एका कवितेत सावित्रीबाईंनी म्हटले होते त्यांच्या ‘काव्य फुले’हा १८५४ साली प्रकाशित झालेला कवितासंग्रह ज्ञानार्जन ज्ञान निर्मिती आणि ज्ञानप्रसार यांनाच वाहिलेला आहे. महात्मा फुले अध्यक्ष चरित्र लेखक व थोर व्यासंगी पंढरीनाथ सिताराम पाटील लिहितात,”सावित्रीबाईंच्या भारतीय स्त्रीच्या उत्थानासाठी केलेला सहृदय कार्याची तुलना करता येणारे एकही उदाहरण एकोणिसाव्या शतकात सापडत नाही”.
महाराणी ताराबाई यांचे कवितेत वर्णन करताना सावित्रीबाई म्हणतात,”छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई, कोल्हापूरची जगदंबा महाराष्ट्राची अंबाबाई, शत्रूवर घाली छापा काळ त्याची होई,

 जेरीस शत्रुला करून करी बेफाम चढाई|| 

ताराबाई माझी मर्दिनी  भासे चंडिका रणांगणी 

रणदेव ती श्रद्धास्थानी नमन माझी ये तिच्या चरणी||”


         या कवितेतून त्यांचा प्रखर स्त्रीवाद दिसून येतो.”सावित्रीबाई या महात्मा फुले यांच्या फक्त पत्नी आहेत असे नाही महाराष्ट्रातल्या स्त्री मुक्ती चळवळीतल्या त्या आद्य प्रणेत्या आहेत.”अशा शब्दात प्राध्यापक ग. बा सरदार त्यांचा गौरव करतात.           

   सावित्रीमाई या मुलींना शिकविण्याकरिता शाळेत जात असत सनातनी लोक हे इतर लोकांना फूस लावत व स्वतःही सावित्रीबाईंच्या अंगावर कचरा, शेण फेकत, दगड मारत, परंतु सावित्रीमाई यांना डगमगता त्यांचे कार्य सुरूच ठेवत, एकदा काही ब्राह्मण मंडळी या सावित्रीमाईंच्या अंगावर सेन फेकतात, त्यानंतर सावित्रीमाईंनी त्या ब्राह्मणाच्या सनकावून कानामागे लावल्या, ही घटना म्हणजे फक्त एका शूद्र स्त्रीने ब्राह्मणाच्या कानामागे लावली नव्हती तर एका ‘स्त्रीवादी विचारवंताने’ समस्त ‘मनुवादी, ब्राह्मणवादी, पुरुषसत्ताक मानसिकतेच्या कानामागे लावलेली झापड होती. त्यामुळेच डॉ. बाबा आढाव म्हणतात,” सावित्रीबाई चे संपूर्ण जीवन क्रांतिकारक आहे.”         

 सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्या एका घटनेचा उल्लेख करतात की त्यांचा भाऊ हा स्त्री व दलितांना शिक्षण देण्यावरून सावित्रीमाईँना आणि ज्योतिरावांना आत्यंतिक वाईट शब्दात बोलत होता. तेव्हा सावित्रीबाईंनी त्यांना उत्तर दिले, “की, भाऊ तुझी बुद्धी कोती असून भट लोकांच्या शिकवणीने दुर्बल झाली आहे तू शेळी, गायांना जवळ घेऊन कुरुवाळतोस, नागपंचमीला विषारी नाग पकडून त्याला दूध पाजतोस. महार,मांग हे तुझ्या समान असतात त्यास अस्पृश्य समजतोसत्याचे कारण सांग?असा त्यास प्रश्न केला. भट लोक सोवळ्यात असता तुझा विटाळ मानतात.  तुला महारच समजतात.” माझे बोलणे ऐकून तो लज्जित झाला. पुसू लागला, “महार मांगांना तुम्ही कशासाठी शिकवतात? याविषयी लोक तुम्हाला अपशब्द देऊन त्रास देतात. हे मला ऐकवत नाही. मी त्यास  इंग्रज लोक महार मांगान साठी काय काय करतात ते सांगून विद्याहीनता ही पशुत्वाची खून आहे व लोकांच्या श्रेष्ठत्वाचा आधारभूत विद्या हीच आहे.तिचा महिमा मोठा आहे जो कोणी तिला प्राप्त करून देईल त्याचे निश्चित दूर पळून उच्चता त्याचा अंगिकार करील. माझे स्वामी देव माणूस आहे. त्याची सर या दिवशी कोणाला येणार नाही. महामानवांनी शिकावे व माणूस म्हणून जगावे या कारणास्तव खटाटोप करणारे ज्योतिबा स्वामी यांना शिकवितात व मी ही त्यास शिकविते पण त्यात अनुचित काय आहे? आम्ही उभयता मुलींना शिकवतो बायांना शिकवतो महार मांगांना शिकवतो हेच ब्राह्मणांना अपायकारक होणार या समजुतीच्या कारणास्तव ते आमच्या माणूस धर्माच्या कामास ब्राह्मण्य ब्रह्मण्य करीत निंदा करतात व तुझ्यासारख्या च्या मनात किल्मिष पेरतात”.       

या सर्व संवादावरून हे लक्षात येते सावित्रीमाई ब्राम्हणी पुरुषसत्ताक वृत्तीच्या विरोधात शिक्षणास मुक्तीचा मार्ग म्हणून पहात होत्या.         

सावित्रीबाई व ज्योतिराव हे स्त्रियांच्या सामाजिक व त्याबरोबरच आर्थिक थिक विकासाकरिता सुद्धा नेहमी आग्रही असत त्यामुळे त्यांनी भारत देशांमधील पहिले शालेय ग्रंथ तर सुरू केलेच परंतु त्याबरोबरच मुला-मुलींना इंग्रजीचे व शेती शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षणसुद्धा दिले. गरीब मुला-मुलींना शिक्षणात अडथळा येऊ नये. म्हणून, त्यांना शिक्षण करण्याकरिता पैसे दिले त्याबरोबरच मुला-मुलींच्या आईवडिलांनी करिता रात्रीची शाळा काढली शिक्षणाचे महत्त्व सांगण्याकरिता ‘तृतीय रत्न’ हे नाटक सुद्धा त्यांनी लिहिले.       

आम्ही पाहिलेले फुले या पुरोगामी सत्यशोधक अंकांमध्ये त्यांचे समकालीन गणपत गोविंद काळे म्हणतात,”आता सावित्रीबाई संबंधाने लिहायचे म्हणजे त्या माऊलीचे एखाद्या लेखकाने स्वतंत्र चरित्र लिहिले पाहिजे. एवढ्या मोठ्या योग्यतेने ज्योतिबा प्रगती करू शकले  त्याचे बरेच मोठे श्रेय त्यांच्यासोबतच सावित्रीबाई यांना दिले पाहिजे. स्त्रियांविषयी एक स्वतंत्र मासिक करण्याबद्दल सावित्रीबाईनी सुचवल्या वरून वाळवेकर आणि ‘गृहिणी’ या नावाचे मासिक काढले होते.” त्यांच्या समकालीन गणपत काळे यांच्या या त्यांच्या बद्दलच्या माता मधून त्यांची ‘स्त्रीवादी’ भूमिका ही प्रकट होते.       

आत्मचरित्रकार ‘धनंजय कीर’ लिहितात की, सावित्रीबाईंच्या अलौकिक कार्य एकोणिसाव्या शतकाच्या स्त्रियांच्या उद्धारासाठी व्यतीत केलेले सावित्रीबाई सारखे आणि आदर्श आणि उदात्त उदाहरण क्वचितच आढळून येईल, पंडिता रमाबाईंचे पांडित्य, भरारी त्यांच्या ठायी नसेल परंतु, मंगल रडाली निर्वाचनमा नव्हता आणि भारतीय गुणवंत रमाबाई त्यांची बरोबरी करु शकले नाही.”

“स्थापाया अधिकार या बायकांचे झटतसे मी सदा अर्पाया न भी किमपिही सर्वस्व माझे कदा! 

             अशी वराला मंगलाष्टकामधून प्रतिज्ञा वदवायला सत्यशोधक विवाह पद्धती लावत असत. अनेक चळवळींमध्ये जोतीराव अनुयायी आणि सावित्रीबाई नेत्या असल्याची लेखी कबुली देऊन जोतीरावांनी त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा केलेली आहे.     

ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी “बालहत्या प्रतिबंधक गृह”, सुरु करून त्यात ३५ स्त्रियांची बाळतपणे पोटच्या मुलाप्रमाणे त्यांनी केली. दुष्काळात सुमारे एक हजार मुलांमुलींच्या मदतीसाठी छावणी सुरू केली.त्याकाळी पती वारल्यानंतर विधवा पत्नी केशवपणा सारख्या भयंकर प्रथांना पुरुषसत्ताक ब्राह्मणी व्यवस्थेमुळे सामोरे जावे लागत असे. विधवांच्या केशवपनाविरुद्ध ना.मे.लोखंड्याच्या साथीने सावित्रीबाई फुले यांच्या नेतृत्वात नाभिकांचा संप झाला आणि महात्मा फुले हयात असून सुद्धा या संपाचे नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी केले. ज्या काळात स्त्रियांना स्मशानभूमीत येण्याची सुद्धा मुभा नव्हती. त्याकाळात, सावित्रीबाईंनी जोतीरावांच्या अंतयात्रेचे नेतृत्व केले स्वतः टिटवे धरले, आणि मुखाग्नी सुद्धा दिला.            ओतुर, सासवड आदी सत्यशोधक परिषदांचे अध्यक्षपद भुषवले. सहा पुस्तके लिहिली. त्या अर्धशतकभर ज्ञानार्जन, अध्यापन, ज्ञानप्रसाराचे आणि ज्ञाननिर्मितीचे काम करीत राहिल्या.    

 आद्य स्त्रीवादी लेखिका – विचारवंत ताराबाई शिंदे यांचा “स्त्री पुरूष तुलना ” हा १८८२ सालचा ग्रंथ केंब्रीजच्या डो‘.रोझालिंड ओ’हेन्लन यांनी इंग्रजीत भाषांतरित केला. तो ऑ‘क्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केल्यानंतर अनेक पाश्च्यात्त्य संशोधकांचे आणि त्यामुळे भारतीय अभ्यासकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. डो‘. रामचंद्र गुहा यांनी त्यांचा समावेश आधुनिक भारताच्या प्रमुख शिल्पकारात केला. पहिल्या भारतीय महिला संपादक तान्हुबाई बिर्जे, आद्य दलित लेखिका मुक्ता साळवे, पहिल्या दलित महिला संपादक आणि नेत्या सावित्रीबाई रोडे या सगळया सावित्रीबाईंच्या विद्यार्थिनी होत्या.     

 सावित्रीबाई फुले या  स्त्रीवादी विचारवंत तर होत्याच. परंतु, देशातील प्रत्येक परिवर्तनवादी चळवळीचे आद्य प्रवर्तक म्हणून फुले दाम्पत्याकडे बघितले जाते.

ऋषीकेश खंडाळे

Share and Enjoy !

Shares

2 thoughts on “पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत – सावित्रीबाई फुले

  • संदिप औटे

    सत्यशोधक
    सत्यपरिवर्तन

    Reply
  • Abhishek Shinde Patil

    खुप छान ऋषी सर…

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *