रेकॉर्ड क्वीन्स मिताली राजचे आंतरराष्ट्रीय पातळीवर १०,००० धावा पूर्ण
भारतीय महिलासंघाची कर्णधार आणि स्टार खेळाडू मिताली राजने तिच्या कारकिर्दीच्या १०,००० धावा पूर्ण केल्या. येवढ्या धावा करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे, तर जगात इंग्लंडच्या एडवर्डस नंतर ती दुसरी महिला ठरली आहे. मिताली आता लवकरच महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला ठरेल.
मितलीची रेकॉर्ड कारकीर्द
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३८ वर्षांच्या मितालीने ३६ धावा करून हा विक्रम पूर्ण केला. तिच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००१ धावा झाल्या आहेत. मितालीचा हा ३११ वा सामना आहे. १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी मितालीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत ३१० सामने खेळले. त्यात १० कसोटी, २११ एकदिवसीय आणि ८९ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्ध मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २२ वर्षांहून अधिक काळ मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करीत आहे.
मितालीच्या नावावर दहा कसोटींत ६३३, २१२ वनडेत ६९७४ आणि ८९ टी-२० सामन्यांत २३६४ धावा आहेत. कारकीर्दीत तिची ७५ अर्धशतके आणि आठ शतके आहेत. त्यातील ५४ अर्धशतके आणि सात शतके तिने वनडेत पूर्ण केली. तिचा सर्वाधिक सामने कर्णधार असल्याचा विक्रम आहे.
बीसीसीआयने ट्वीट करीत मितालीला ‘शानदार खेळाडू’ असे संबोधले. सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे सचिव जय शहा, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, वासिम जाफर यांनी मितालीचे कौतुक केले.
भारतामध्ये महिला क्रिकेटची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून मिताली राज ओळखली जाते. महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर अशीदेखील तिची ओळख आहे. वयाच्या ३८ व्या वर्षीसुद्धा अशी उत्कृष्ट कामगिरी करत असल्यामुळे मिताली लगेच निवृत्त होणार नाही अशी आशा क्रिकेट फॅन्स करत आहेत.