“पाच डॉलरला मिळाले तरी घेणार नाही” राकेश झुनझुनवाला यांचे बिटकॉइन वर विधान
जान्हवी दैठणकर: औद्योगिक क्षेत्रातील प्रख्यात गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी मी कधीच बिटकॉइन विकत घेणार नाही असे वक्तव्य केले आहे. सीएनबीसी इंटरनॅशनल टीव्ही च्या मुलाखतीत बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करणार का असा प्रश्न विचारल्यावर “पाच डॉलरला जरी मिळाले तरी घेणार नाही” असे विधान झुनझुनवाला यांनी केले.
जगभरात क्रिप्टो करन्सीचा व्यवहार वाढत असताना झुनझुनवाला यांनी मात्र क्रिप्टो करन्सीची टीका केली. याच मुलाखतीत फक्त सरकार अथवा आर्थिक संस्थांना चलन ठरवायचा अधिकार आहे आणि तो तसा राहावा असे मत त्यांनी मांडले. जे चलन रोज 5 ते 10 टक्क्यांनी हेलकावे खाते त्याला चलन कसे मानता येईल असा प्रश्नही त्यांनी मांडला.
क्रिप्टो करन्सीची लोकप्रियता एकीकडे वाढत असताना एका उच्चस्तरीय समितीने भारतात सर्व खाजगी क्रिप्टो करन्सींवर प्रतिबंध आणावा असा सल्ला दिला आहे. केवळ सरकार द्वारे चलनात आणल्या जाणाऱ्या वर्चुअल करन्सींना मान्यता दिली जावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. केंद्र सरकार या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेईल असे वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते.
बिटकॉइन अथवा कुठल्याही खाजगी क्रिप्टो करन्सीवर प्रतिबंध यावा व चलन हे देशाचे सरकार आणि आर्थिक संस्थेनी म्हणजे आरबीआयने ठरवावे आणि नियमित करावे असे ठाम मत मांडत राकेश झुनझुनवाला यांनी बिटकॉइन मध्ये कधीच गुंतवणूक करणार नाही असे स्पष्ट केले.