इंधनावरील करात कपात? महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात जनतेला दिलासा मिळण्याची अपेक्षा
महाविकास आघाडी सरकारचा सोमवारी दुसरा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार विधानसभेत सादर करणार आहेत. यात पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींवर दिलाचा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
गेल्या काही दिवसात केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांनी आपापले स्थानिक कर कमी करून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी कराव्यात असे आवाहन राज्यांना केले होते. तर बहुतांश राज्य सरकार यांची मागणी आहे की केंद्राने आपले कर कमी करावेत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किमतींमध्ये सतत वाढ होत असल्याने सामान्य लोकांच्या अर्थकारणाला फटका बसला आहे.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा 1 लाख 14 हजार कोटींपेक्षा अधिक तुटीचा अर्थसंकल्प मांडला जाईल अशी भीती वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोरोना महामारी मुळे राज्यात उत्पन्नाचे स्त्रोत घटले आहेत तर आस्थापनेवरील खर्च वाढले आहेत. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर इंधना करात कपात करून सामान्य जनतेला दिलासा मिळतो का यावर सगळ्यांचा नजरा आहेत.