ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांचं निधन
मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर यांचे रविवारी दि.२८ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने औरंगाबादमध्ये निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाथरावांचे जन्मगाव नांदेड आहे.त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ नाथराव नेरळकरांनी संगीत क्षेत्रात आपले योगदान दिले. गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतलेल्या नाथरावांनी औरंगाबाद इथं सरस्वती भूवन महाविद्यालयात संगीत विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांची शास्त्रीय, सुगम, ख्याल, ठुमरी, भजन, गजल, तराणा आदी संगीतप्रकारांवर हुकमत होती. संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना संगीत नाटक अकादमीसह राज्य शासनाचा कलादान पुरस्कार, मुंबई राज्य नाट्य महोत्सव श्रेष्ठ अभिनेता पुरस्कार, तसंच औरंगाबाद भूषण पुरस्कार, २०१५ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीची सन्मानाची फेलोशिप मिळाली होती. दिल्लीत त्यांचा सन्मान झाला होता. यानंतर २०१७ मध्ये त्यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. विख्यात शास्त्रीय गायक पंडित अण्णासाहेब गुंजकर यांची संगीत परंपरा त्यांनी पुढे नेली. शास्त्रीय संगीताला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि सर्व स्तरातील श्रोत्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. नांदेड येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणा-या संगीत शंकर दरबारात त्यांची आवर्जून हजेरी असायची. त्यांच्यामुळे जागतिक कीतीर्चे अनेक गायक, वादक मराठवाड्यातील संगीत महोत्सवात सहभागी झाले. अशा वयाची 85 ओलांडली तरी त्यांची संगीत साधना अविरत चालू होती, त्यांनी विविध रागांतील अप्रतिम अशा जवळपास 51 बंदिशींची रचना केली होती ज्या आजही त्यांचा शिष्यवर्ग व इतर मान्यवर गातात. पं. नेरलकर यांच्या पश्चात गायिका हेमा उपासनी नेरलकर ही मुलगी, संगीतकार जयंत नेरलकर व क्रिडा क्षेत्रातील तज्ज्ञ अनंत नेरलकर ही मुलं, सुना, जावाई, नातवंडं असा परिवार आहे.