‘शिकारी’ चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केलेल्या नेहा खानचा खडतर प्रवास
अभिनेत्री नेहा खानने ‘शिकारी’ चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला, त्यानंतर ती आता देवमाणूस या मालिकेत एसीपी दिव्या सिंगची भूमिका साकारत आहे. बालपणापासूनच नेहाचा प्रवास फार खडतर होता.
नेहा ही मूळची अमरावतीची रहिवाशी आहे. शिवाय तिची आई मराठी आणि वडील मुस्लिम त्यामुळे त्यांचा लग्नाला कुटुंबातील सदस्यांचा विरोध होता. तिच्या वडिलांचे आधी दोन लग्न झालेले असून प्रेमापोटी त्यांनी लग्न केले. परंतु संपत्तीत कोणी वाटेकरी नको म्हणून नेहाच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीने नेहाच्या आईला त्रास दिला, त्यावेळी तिने नेहाच्या आईला मारायला ३ गुंडं पाठवली होती. त्या गुंडांच्या तावडीत सापडल्यामूळे नेहाची आई गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे त्यांना इस्पितळात भरती करून ३७ टाके लावण्यात आले असल्याने त्यांचा फक्त एकाच डोळा उघडा होता.
त्यावेळी या चिमुरड्यांनी लोकांकडून पैसे गोळाकरून आईचे उपचार पूर्ण केले. आई अंथरुणाला खिळून आणि वडिलांना अर्धांगवायूचा झटका यानंतर उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी नेहा व तिच्या भावाने मिळेल ती कामे करण्यास सुरुवात केली. आई बरी झाल्यानंतर आईने घरोघरी धुणीभांडी केली त्यानंतर मेस चालवली. थोडे पैसे जमा झाल्यानंतर एक म्हैस घेतली नंतर दुसरी. म्हशीचे दूध काढणे, शेण काढणे या सगळ्या कामांची जवाबदारी नेहावर येऊ लागली.
अंगाला शेणाचा वास येतो म्हणून कोणी कधी मैत्री केली नाही, कोणी जवळ बसत नसे, शाळेची फी भरायला पैसे नसल्यामुळे तिचे मन शिक्षणात कधी रमले नाही. काहीतरी करायला हवे या विचाराने तिला मॉडलिंगचे वेध लागले. अभिनयात रस असल्यामुळे तिने मुंबईला जायचे ठरवले. त्यानंतर अनेक ऑडिशन्स देत तिने चित्रपटात काम करायला सुरुवात केली. आणि आता ती यशाची शिखरे गाठताना आपल्याला दिसतेय.