नथीचा नखरा!
नथ घालण्याचा हल्ली फॅशन ट्रेंड सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का विवाहित महिला नाकांमध्ये नथ का घालतात? तसंच सध्या सुरू असलेल्या नथीच्या फॅशनचा ट्रेंड ?
नाकामध्ये नथ आणि पायांच्या बोटांमध्ये जोडवी पाहून एखादी महिला विवाहित असल्याचा अंदाज लावला जातो. पण बदलत्या वेळेनुसार नथ आणि पायामध्ये मासोळी घालण्याचा फॅशन ट्रेंड सुरू झाला आहे.
आज कित्येक तरुणींच्या नाकामध्ये नथ आणि पायांमध्ये स्टायलिश मोसाळी आपल्याला पाहायला मिळते.
भलेही या दोन गोष्टींचा आज फॅशनेबल दागिन्यांमध्ये समावेश झाला असला तरी ‘नथ’ (Nath) आणि ‘जोडवी’ या सौभाग्य अलंकारांना विशेष महत्त्व आहे.
नथ घालण्यामागील परंपरा आणि वेळेनुसार नथीच्या स्टाइलमध्ये बदल झाले आहेत .
हिंदू धर्मामध्ये विवाहित महिलांच्या सोळा श्रृंगारास खूप महत्त्व आहे.
कपाळावरील कुंकूपासन ते पायातील जोडवी आणि नाकातील नथीपासून ते बांगड्या, हे सारं सोळा श्रृंगाराचा भाग आहे.
सुवासिनींनी नाकामध्ये नथ घालण्याची परंपरा जुनी आहे.
घरामध्ये एखादे शुभ कार्य असल्यासंही महिला नाकामध्ये नथ घालतात. ‘नथ’ सौभाग्याचे प्रतीक आहे .
जुन्या काळापासून वापरात असलेल्या काही दागिन्यांची फॅशन आज तरुणींमध्ये पाहायला मिळते.
सर्वात आधी रिंग डिझाइन असणारी नथ नाकामध्ये घातली जात असे.
पाहता – पाहता ही फॅशन आता ट्रेंडमध्ये आली आहे. दरम्यान, रिंग नोझ पिनची फॅशन आजही कायम आहे.
बॉलिवूडमधील कित्येक अभिनेत्री देखील रिंग नोझ पिनची फॅशन फॉलो करतात.
कॉलेजमधील विद्यार्थिनींमध्ये रिंग डिझाइन नथीचा ट्रेंड सर्वात जास्त पाहायला मिळतो. कॉलेजमधील कोणत्याही फंक्शनसाठी तरुणींकडून नथीला सर्वात आधी पसंती असते.
दरम्यान, सध्या वेगवेगळ्या आकारात, नक्षीकाम तसंच फुलाच्या डिझाइन असलेली नथ बाजारात उपलब्ध आहेत. या फॅशनेबल रिंग नाकामध्ये घालून तुम्ही स्वतःला स्टायलिश लुक देऊ शकता.
– ऐश्वर्या शिलवंत