महाराष्ट्र

मास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेची धडक कारवाई !

एका दिवसात ४६ लाखांची दंड वसुली

मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘बिना  मास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे व अधिक व्यापकतेने करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात २२ फेब्रुवारी रोजी महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली. मुंबईत एकूण २२ हजार ९७६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाई दरम्यान रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्ये देखील धडक कारवाई करण्यात येऊन कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यानुसार महानगरपालिकेद्वारे 14606 व्यक्तींवर, मुंबई पोलिस दलाद्वारे ७९११ व्यक्तींवर, मध्य रेल्वेद्वारे २३८ व्यक्तींवर, पश्चिम रेल्वेद्वारे २२१ व्यक्तींवर अशारितीने एकूण २२९७६ व्यक्तींवर बिना मास्क विषयक कारवाई करण्यात येऊन प्रत्येकी रुपये २०० यानुसार एकूण रुपये ४५ लाख ९५ हजार २०० एवढी दंड वसुली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सातत्यपूर्ण व अधिक प्रभावी कारवाई आहे.

२२ फेब्रुवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान महापालिकेच्या ‘एल’ विभागात सर्वाधिक म्हणजे ८७५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. यामध्ये त्यांच्याकडून १ लाख ७५ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. ‘आर मध्य’ विभागात ८१९ जणांकडून १ लाख ९३ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *