आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरा:आ.सतीश चव्हाण यांची मागणी
राज्यात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातील वर्ग 1 ते वर्ग 4 ची रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत अशी मागणी आज (दि.17) मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना दिलेल्या पत्रात आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या संकट काळात आपल्या स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, परिचारिकांपासून ते आरोग्य सेवा देणारे कर्मचारी युध्दातील सैन्याप्रमाणे लढत आहेत. मात्र हे सैन्य तोकडे पडत असून पदांच्या तुटवड्याचा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा राहीला आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग 1 ते वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात आम्ही 8 मार्च 2021 रोजी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात जवळपास 18397 पदे रिक्त असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते. अनेक ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी अशी महत्वाची पदे रिक्त असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.
तसेच राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात वर्ग 1 ते वर्ग 4 संवर्गातील पदे सुध्दा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. गोर गरीब रूग्णांसाठी महत्वाचा आधार म्हणून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाला (घाटी) ओळखले जाते. मात्र याठिकाणी सन 2010 पासून रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. याठिकाणी वर्ग 1 ची 24, वर्ग 2 ची 37, वर्ग 3 ची 216 तर वर्ग 4 ची 298 अशी जवळपास 575 पदे रिक्त आहेत. हीच परिस्थिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर, डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, अंबाजोगाई या मराठवाड्यातील शासकीय रूग्णालयांची असून याठिकाणी देखील मोठ्याा प्रमाणावर पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच औरंगाबाद व लातूर येथे अतिविशेषोउपचार (सुपरस्पेशालिटी) रूग्णाालय सुरू करण्यासाठी शासनाने 8 जानेवारी 2021 रोजी वर्ग 1 ते वर्ग 4 पदांना मान्यता दिली आहे. मात्र सदरील पदे भरण्यासंदर्भात शासनस्तरावर अद्यापही काहीच कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी पत्राव्दारे निदर्शनास आणून दिले आहे.
आरोग्य विभागातील कर्मचार्यांना कोरोना बाधित रूग्णांबरोबरच नॉन कॉविड रूग्णांवर देखील उपचार करावे लागत आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचार्यांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील वर्ग 1 ते वर्ग 4 ची रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.