मिस श्रीलंका’स्पर्धेच्या मंचावर हंगामा; हीसकावलं विजेतीचं मुकूट
अनेकदा काही स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांमध्ये काही वाद निर्माण होतो आणि त्यातून थोडेफार खटकेही उडतात. मात्र, जर एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जर हाणामारीचा प्रकार घडला तर? हो, असाच काहीसा प्रकार ‘मिसेस श्रीलंका 2021’च्या (Mrs Sri lanka contest)मंचावर घडला आहे. या स्पर्धेची विजेती ठरलेल्या महिलेचा मुकुट भर स्पर्धेत खेचून दुसऱ्या स्पर्धक महिलेला देण्यात आला. अर्थात ही घटना घडत असताना माध्यमांचे कॅमेरे या महिलांवर रोखलेले होते.
मात्र, या प्रकरणात विजेती स्पर्धक जखमी झाली. इतक्या मोठ्या मंचावर स्पर्धेच्या विजेतीचा अशा प्रकारे झालेल्या अपमानामुळे या स्पर्धेवर टीका देखील झाली. मात्र, हा प्रकार अगदी क्षणार्धार्त घडल्याने स्पर्धेचे आयोजक देखील हैराण झाले होते. त्यांनी नंतर विजेत्या पुष्पिका डिसिल्वा यांची माफी मागत हा किताब आणि मुकुट त्यांना सन्मानाने परत केला. 2019ला या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या कॅरोलिन जूरीने सदर प्रकार केला. नेमकं काय झालं?या सौंदर्य स्पर्धेत स्पर्धक असणाऱ्या पुष्पिका डिसिल्वा यांना ‘मिसेस श्रीलंका’ या किताबाने गौरवण्यात आले. या घोषणेनंतर मंचावर त्यांना रनरअपसोबत मनाचा ताज घालण्यात आला.
यानंतर या स्पर्धेच्या मंचावर गतवर्षीची अर्थात 2019ची विजेती स्पर्धक कॅरोलिन जूरी तेथे आली आणि तिने पुष्पिका यांच्या डोक्यावरून तो मुकुट खेचून घेतला. जूरीने सांगितले की पुष्पिका डिसिल्वा ही एक घटस्फोटित महिला आहे. त्यांना या स्पर्धेची विजेती घोषित करणे अतिशय चुकीचे आहे. जुरीने डिसिल्वा यांच्या डोक्यावरून जेव्हा मुकुट उतरवला, तेव्हा त्यांचे केस खेचले गेले आणि त्या जखमी देखील झाल्या. यानंतर पुष्पिका डिसिल्वा रडत रडत त्या मंचावरून उतरल्या आणि निघून गेल्या.
यावेळी पुष्पिका यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा कार्यक्रम श्रीलंकेची राजधानी असणाऱ्या कोलंबो येथील एका थिएटरमध्ये सुरु होता. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण देखील होत होते. या घटनेनंतर आयोजकांनी पुष्पिका डिसिल्वा यांची माफी देखील मागितली.माझ्यासारख्या अनेक महिलांना हा त्रास भोगावा लागतो!
यावर स्पष्टीकरण देताना पुष्पिका म्हणाल्या, ‘माझा घटस्फोट झालेला नाही. मी केवळ पतीपासून वेगळी राहत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ मी एकटीने करते. आज माझ्यासारख्या अशा कितीतरी महिला श्रीलंकेत आहेत. त्यांना देखील माझ्यासारखाच त्रास सहन करावा लागतो. या कार्यक्रमात माझ्यासोबत जे घडले ते खरंच खूप अपमानास्पद होते.’ तर, आयोजकांनी देखील त्यांची माफी मागत यावर पुढे तपास होईल, तसेच योग्य ती कारवाई देखील केली जाईल, अशी ग्वाही दिली.