मासिक पाळीच्या वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय
मासिक पाळी ही महिलांना नैसर्गिक शारीरिक क्रीया आहे. प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळीला सामोरे जावेच लागते. प्रत्येक महिलेच्या शारिरीक रचना, आहार, जीवलशैलीमध्ये फरक असल्याने मासिक पाळीचा त्रासही वेगवेगळा असु शकतो. या दिवसांमध्ये कंबर दुखणे, डोकेदुखी होणे, पोटात असह्य वेदना होणे यांसारख्या समस्यांना महिला सामो-या जात असतात. कामासाठी बाहेर पडणा-या महिलांना हा त्रास सहन करणे अतिशय अवघड असते. फार कमी महिला असतात ज्यांना, या दिवसांत त्रास होत नाही. दरवेळी या वेदनांपासुन आराम मिळवण्यासाठी औषधोपचार आणि वेदनाशामक गोळ्या घेण्यापेक्षा काही घरगुती उपचार करणे नक्कीच फायदेशीर ठरेल.
१) मासिक पाळी सुरु झाल्यावर वेदना कमी होण्यासाठी पोटदुखी सुरु झाल्यावर काही वेळ आराम करा.
२)पाळी सुरु होण्याआधी किंवा सुरु झाल्यानंतर काही दिवस गरम पाणी प्या. ज्यामुळे तुमचे पोट दुखणे कमी होईल.
३)मेथीचा लाडू किंवा मेथीचे दाणे टाकुन उकळलेले कोमट पाणी प्या. गाजराचा रस घेतल्यानेही त्रास कमी होतो.
४)झोपण्यापुर्वी पोटावर कोमट तेलाचा लेप लावून, गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घ्या.
५)मासिक पाळीमध्ये नेहमी सात्विक आणि हलका आहार घ्या. मांसाहार किंवा जड आहार खाणे टाळा.
६)मासिक पाळी सुरु असताना पपई खाल्याने रक्तस्त्राव चांगला होतो, ज्यामुळे वेदना कमी होतात.
७)या काळात शांत संगीत ऐका, ज्यामुळे तुमचे मन शांत होईल आणि त्रास देखील कमी होईल. तुमच्या आवडीच्या पुस्तकाचे वाचनही तुम्ही करु शकता.
८)मासिक पाळीदरम्यान तेलकट आणि मीठाचे पदार्थ खाणे टाळा. शिवाय जड व्यायाम न करता, योगासने किंवा प्राणायाम तुम्ही करु शकता.
९)या काळात डोके दुखत असेल तर हेडमसाज करा, याने तुम्हाला नक्की आराम मिळेल. पाळीचे आठ तास शांत झोप घ्या.
– श्रुती बहिरगावकर