लाइफस्टाइल

लॉकडाऊनमध्ये मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

लॉकडाऊनमुळे युवा पिढीमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत चाललेले आहे .आपण वृत्तपत्रामध्ये आत्महत्येची बातमी वाचल्यानंतर थोडीशी हळहळ व्यक्त करून सर्व विसरून जातो

आणि आपल्याच तंद्रीत असतो. पण आपण आपल्या शरीराची वस्तुत: आरोग्याची काळजी घ्यावी असा हा प्रतिकूल काळ आहे.

त्वचेची काळजी कशी घ्यावी, केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण नेहमी वाचत असतो, आपण त्याबद्दल जागरूकही असतो.

पण मानसिक आरोग्याची कोणीच काळजी घेत नाही. त्याबद्दल कोणी बोलतही नाही.

लॉकडाऊनमुळे लोकांचे दैनंदिन आयुष्य बदलले आणि त्याचा परिणाम लोकांच्या मानसिक आरोग्यावर झाला.

जितकी आपण शरीराची काळजी घेतो तितकी आपण मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी.

१) आत्मपरीक्षण

जर एखादी गंभीर समस्या आपल्या आयुष्यात असेल तर ते मनात न ठेवता आपल्या जवळच्या व्यक्तींना त्याबद्दल बोलावे.

आपल्या समस्यांवर काय काय उपाय निघू शकतील याचे आत्मविश्लेषण करावे. एक रोजनिशी लिहून तुम्ही तुमच्या समस्यांचे उपाय त्याच्यात लिहू शकता.

ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबद्दल विचार करणे टाळावे.

वाईट गोष्टींबद्दल विचार करून स्वतःवर दबाव आणू नये, त्यापेक्षा आपल्या बाजूच्या गोष्टी कशा अधिक चांगल्या होतील याचा विचार करावा.

जे लोक आपल्या बद्दल वाईट चिंतीतात त्यांच्यापासून दूरच राहावे आणि आपल्या जवळच्या लोकांना अधिक जवळ करावे.

मीच वाईट सगळे चांगले असा न्यूनगंड चुकूनही मनात आणू नये. तुमची प्रतिमा तुमच्या मनात नेहमी चांगलीच असावी यामुळे ती बाहेरच्या समाजातही चांगलीच राहील.

२) पोषक आहार

परिपूर्ण अन्नाचे सेवन तर करावेच पण त्यासोबतच ‘मूड बूस्टर’ अन्न खावे. मूड बूस्टर अन्न म्हणजे जे अन्न खाल्ल्याने आपला मेंदू सेरोटोनिन हा द्रव सोडतो.

ज्यामुळे आपले मन आनंदी होते. डार्क चॉकलेट,दही, ब्लूबेरी हे उत्तम मूड बुस्टर्स आहेत. बदाम,अंबाडीच्या बिया,सूर्यफुलाच्या बिया याचे सेवन दुधासोबत करू शकतो.

३) ताणतणाव टाळावा

स्वतःला किंवा दुसऱ्याला दोष देणे टाळावे. जे काही झाले ते आपल्या हातात नव्हते, असा विचार करून ते विसरून जावे. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, त्यात आपले मन गुंतवावे.

आपले काय छंद आहेत त्याची एक लिस्ट तयार करून लॉकडाऊन मध्ये रोज एक गोष्ट जी आपल्याला आवडते ती करावी. एखादी नवीन कला शिकून घ्यावी.

४) व्यायाम करावा

योगा केल्याने मन शांती मिळते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण रोज रोज व्यायाम करणे बऱ्याच लोकांकडून होत नाही.

त्यामुळे योगाला पर्याय म्हणून आपण व्यायाम करू शकतो. व्यायाम केल्याने फक्त शरीरच नाही तर मनसुद्धा निरोगी होते.

व्यायाम करणे अवघड वाटत असेल तर तुम्ही नृत्य करू शकता. आजकाल युट्युबवर बरेच वेगवेगळे नृत्य प्रकार सापडतील जे आपण घरी करू शकतो.

यामुळे मनोरंजन होऊन आपले मानसिक आरोग्य चांगले राहील.

५) संवाद साधावा

स्वतःला लोकांपासून दूर करू नये आणि त्यांच्यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मनातील आपल्या मित्रांना किंवा आपल्या कुटुंबाला सांगावे.

तुमची सांगायची इच्छा नसेल तरी चालेल पण त्यांना तुमच्यापासून तोडू नका.

जितके तुम्ही अधिकाधिक एकटे राहाल तितका तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन असले तरी तुम्ही काही प्रमाणात लोकांशी संपर्क साधू शकता. गार्डनमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत फेरफटका मारायला जाऊ शकता.

६) मदत मागा

जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला आता हे सहन होत नाही तर लगेच हेल्पलाईन नंबर वर कॉल करा.

इंटरनेटवर अशा असंख्य हेल्पलाइन नंबर्स आहेत ज्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा आपल्या एखाद्या जवळच्या मोठ्या व्यक्तीकडून कौन्सिलिंग करू शकता.

७) वेळापत्रक पाळा

लॉकडाऊनमध्ये लोकांचे वेळापत्रक अस्ताव्यस्त झाले आहे. उठण्याचा आणि झोपण्याचा एक वेळ ठरवून घ्यावा आणि त्या वेळापत्रकाचे पालन करावे. आपल्या आजूबाजूचे वातावरण चांगले असले तरच आपल्याला चांगले वाटते. त्यामुळे जिथे राहात असाल ती जागा स्वच्छ ठेवावी. यामुळे एक नवीन ऊर्जा आपल्या शरीरात येते आणि आपले मन शांत राहते.

क्षितिजा तिडके

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *