मुलाखत

मी ग्रेटफूल….कारण माझी मातृभाषा मराठी आहे – केतकी माटेगावकर

राजभाषा दिनानिमित्त मराठी चित्रपट क्षेत्रातील यशस्वी युवा अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्याशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी मराठी चित्रपट क्षेत्रातील बदलत जाणारी परिस्थिती आणि तिच्या वैयक्तिक प्रवासाबद्दलचे अनुभव यावेळी तिने सांगितले.

१) मराठी सिनेसृष्टीत जवळपास १० वर्ष तुला आता झाली आहेत, या काळात खूप बदल झाले या क्षेत्रात आणि या बदलाचा तू प्रत्यक्ष भाग राहिली आहेस. या बदलाबद्दल काय सांगशील ?

– सगळ्यात पहिली भावना जी माझ्या मनात येत असते ती म्हणजे ‘ग्रॅटीट्यूड’! मी खूप ग्रेटफूल आहे, कारण माझी मातृभाषा मराठी आहे. माझ्या करिअरची सुरुवात दादासाहेब फाळकेंनी सुरू केलेल्या मराठी सिनेसृष्टीत झाली आहे. मराठी संगीत सृष्टीतही मी काम करतेय. त्यामुळे मराठी असल्याचा मला अभिमान आहे. त्यानंतर मी आता ‘सार’ या हिंदी टायटल सॉंगसाठी गायले, जे सध्या खूप गाजतंय आणि मधल्या काही काळात मी तमिळ चित्रपटांमध्ये कामसुद्धा केलंय आणि गाणी सुद्धा गायली आहेत. पण ते केवळ मराठी चित्रपट सृष्टीमुळेच. म्हणजे आज जे काही मला मिळतंय ते केवळ मराठी चित्रपटांमुळेच. त्यामुळे मी मराठी चित्रपटसृष्टीची खूप आभारी आहे.

२) काकस्पर्श, शाळा, तानी, आणि ‘प्राजु’ यासारख्या साध्या मुलीच्या भूमिका ते आता चाहत्यांच्या पसंतीस पडणारे बोल्ड आणि घायाळ करणारे तुझे फोटोशूट, काय सांगशील या प्रवासाबद्दल ?

– आताचं माझं फोटोशूट म्हणजे त्याला ग्लॅमरस फोटोशूट असं म्हणेल. करण ते आम्ही असं ‘बोल्ड’ म्हणून ठरवून केलेलं नव्हतं. काकस्पर्श, टाईमपास, तानी या भूमिका साध्याआहेत म्हणून मी केल्या असं नाही, तर खऱ्या आयुष्यातली केतकी जशी आहे तशी मी या भूमिकांमध्ये साकारण्याचा प्रयत्न केलाय.

3) तू अभिनेत्री आणि गायिकासुद्धा आहेस. यातून तुला एक निवडावं लागलं तर तू कोणत्या क्षेत्राला प्राध्यान्य देशील ?

– कला ही गोष्ट अशी आहे की या गोष्टीतून सगळ्यांना फक्त आनंदच मिळतो. मी स्वतःलाच प्लेबॅक दिला. त्यानंतर पर्ण पेठे जी एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे तिलाही मी ‘प्रियकरा’ या संस्कृत गाण्यासाठी आवाज दिला. त्यामुळे अभिनय आणि संगीत या दोन्ही गोष्टी खूप हँड इन हँड गेल्या आहेत माझ्यासाठी. जेव्हा मी एक गायिका असते तेव्हा मी अभिनेत्री नसते आणि जेव्हा मी एक अभिनेत्री असते तेव्हा मी गायिका नसते. त्यामुळे जसं आई मुलांमध्ये निवड करू शकत नाही की हा माझा लाडका तसंच माझं अभिनय आणि संगीताबद्दल आहे.

4) मराठी सिनेसृष्टीचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत जात आहे. महिला, तरुण यांच्याशी संबंधित चित्रपट, मालिका येतायेत. तर तुला काय वाटतं मराठी इंडस्ट्रीची ग्रोथ अशीच होत राहील का?

– नक्कीच होईल आणि होत आहे. अगदी रॅपिडली होत आहे. मराठी सिनेमांचा स्ट्रॉंगेस्ट पॉईंट म्हणजे त्यांच्या कथा. या कथाच प्रेक्षकांना पुढे घेऊन जातात. असे चित्रपट जे आतापर्यंत आलेत त्यांच्यामध्ये कमर्शिअल सेन्स पण आता येत आहे. टाईमपास, शाळा या मी केलेल्या कमर्शिअल फिल्म आहेत. म्हणजे आता आर्ट फिल्म पुरताच मराठी सिनेमा राहिला नाहीये. लोकं आता कथा बघतात आणि याच नुसार मराठी इंडस्ट्रीने प्रोग्रेस केली आहे, याचा मला अभिमान वाटतो.

5) मराठी मालिकांकडे प्रेक्षकांचा वर्ग वाढताना दिसत आहे. तुझं काय मत आहे मराठी मालिकांविषयी ?

– खरं तर मी मालिका स्वतः केली नसल्याने माझा फार अभ्यास नाहीये त्याचा. पण घरी माझ्या काकू, आजी बघतात. काही काळापूर्वी झी वर पल्लवी जोशी अभिनित असंभव मालिका येऊन गेली, परत अग्निहोत्र, आभाळ माया या मराठीतील अप्रतिम मालिका आहेत. कारण परत विषय आहे इथे तो म्हणजे कथा. हे दाखवून देतं की कथेत ताकत असेल तर प्रेक्षक वर्ग वळतो, हे माझं मत आहे. मग ते हिंदी असो किंवा मराठी.

6) बॉलीवूडबद्दल तुझं काय मत आहे? काय भावना आहेत तुझ्या पुढच्या करिअरबद्दल?

– नक्कीच आवडेल मला. कारण मी एक कलाकार आहे आणि कलाकाराला भाषेचं बंधन नसतं. कला ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही भाषेत उत्तम व्यक्त होते, खुलून येते. आणि जसा मला मराठीचा अभिमान आहे तसंच एक भारतीय असल्याचाही आहे. आता ग्लोबलायजेशल होत असल्याने फक्त हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू, मल्याळम, इंग्लिश, बंगाली अशा कुठल्याही भाषेत जर मला चांगली भूमिका मिळाली तर काम करायला आवडेल. आणि महाराष्ट्राला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर रिप्रेसेन्ट करणं हेच स्वप्न बाळगून मी पुढील मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे.

7) सध्या अनेक तुझ्यासारखेच स्वप्न बाळगून ते पूर्ण करण्यासाठी धडपडताना बघतोय. तू काय संदेश देशील?

– एक म्हणजे मी या चित्रपट सृष्टीत असो किंवा संगीत क्षेत्र असो, यामध्ये फार लवकर आले. म्हणजे चौथ्या वर्षी मी पाहिली शॉर्ट फिल्म केली, पहिला अल्बम केला. म्हणून वयाने आणि अनुभवाने मी अजूनही इतकी मोठी नाही. पण तरीही येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगेल की, फक्त तुमच्या हृदयाला आणि पॅशनला फॉलो करा. प्रसिद्धी आणि संधींच्या मागे जाण्यापेक्षा तुमचं व्यक्तिमत्व बनवण्यात वेळ द्या, स्किल मजबूत करा. संधी स्वतःहून तुमच्या मागे येतील. आणि फक्त स्वतःशी कॉम्पिटिशन करा. स्वतःला कमी लेखू नका.

मुलाखत – भाग्यश्री रायपूरकर

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *