जयंत पाटलांनी केला टप्प्यात कार्यक्रम..
भाजप नगरसेवकांवर कारवाई करणार ?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपचा केला टप्प्यात कार्यक्रम. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची पाच मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.
चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. नगरसेवक फोडाफोडीच्या शक्यतेमुळे महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली, जी अखेर व्यर्थ ठरली.
राष्ट्रवादीला सहकार्य करणाऱ्या सात नगरसेवकांवर भाजपकडून कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचं व्हीप डावलून काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केल्याने सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाई करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.