इरफान पठाणला कोरोना
काही दिवसांपूर्वी आटोपलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये देशविदेशातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. मात्र या स्पर्धेत सहभागी झालेले अनेक क्रिकेटपटू आता एकापाठोपाठ एक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण, सुब्रह्मण्यम बद्रिनाथ यांच्यानंतर आता इरफान पठाणलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. इरफान पठाणने सोशल मीडिवरून ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये इरफान पठाण म्हणतो की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र मला कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. मी स्वत:ला आयसोलेट केले असून, मी घरीच क्वारेंटाइन आहे. गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी, तसेच सर्वांनी मास्कचा वापर करा आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करा”, असे आवाहन इरफान पठाणने केले आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह आलेला इरफान पठाण हा चौथा भारतीय क्रिकेटपटू आहे.