संजू सॅमसनची शतकी पारी व्यर्थ,किंग्स इलेव्हन पंजाबचा चार धावांनी विजय
आज मुंबई येथे झालेल्या तिसऱ्या आयपीएल सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा चार धावांनी पराभव केला असून यात संजू सॅमसनची ताबडतोड शतकी पारीसुद्धा राजस्थानला जिंकवू शकली नाही .
प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली.मयंक अगरवाल अवघ्या २४ धावा करून तंबूत परतला.त्यानंतर ख्रिस गेल आणि के एल राहुल यांनी मोर्चा सांभाळला व धावगती वाढवली.गेल २८ चेंडूत ४० धावा करून तंबूत परतला.त्यानंतर आलेल्या दीपक हुड्डाने चांगलीच फटकेबाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांची दमछाक केली व धावांचा पाऊस पाडला.यात हुड्डाने अवघ्या २८ चेंडूत ६४ धावा करत राजस्थानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले.या पारित त्याने सहा षटकार व चार चौकार मारत चौफेर फटकेबाजी केली.केएल राहुलही दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत होता.राहुलने ५० चेंडूत ९१ धावा केल्या ज्यात पाच षटकार व सात चौकाराचा समावेश आहे.परंतु शतक करण्यात राहुल अपयशी ठरला.पंजाबने सहा खेळाडूच्या मोबदल्यात २२१ धावांचा डोंगर उभा केला.राजस्थानकडून चेतन सकारियाने ३ बळी मिळविले तसेच ख्रिस मॉरिसनेही २ बळी मिळविले.
प्रत्युत्तरात धावांचा डोंगर सर करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानची सुरुवात अगदीच खराब झाली.पाहिले दोन फलंदाज अनुक्रमे ० आणि १२ धावा करून तंबूत परतले.परंतु संजू सॅमसनच्या शतकी पारीने पंजाबच्या काळजाचा ठोका चुकवला.एकवेळी राजस्थान जिंकेल की काय? असा प्रश्न पंजाबच्या चाहत्यांना पडला असावा.परंतु शेवटच्या चेंडूवर सॅमसनला बाद करत अर्शदीपने पंजाबच्या विजयास मोहर लावली.सॅमसनने ६३ चेंडूत ११९ धावांचा पाऊस पाडत पंजाबच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले परंतु अर्शदीपने हा अडसर दूर करत पंजाबच्या विजयात मोलाचा वाटा दिला.अर्शदीपने पंजाबकडून ३ गडी बाद केले.