निर्णायक सामन्यात कोण मारणार बाजी?
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी खेळला जाईल. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडने दुसरा एकदिवसीय सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघाला तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे. तिसऱ्या वन डे मध्ये प्लेइंग 11 काय असेल, अशी चर्चा सुरु असताना तिसऱ्या सामन्यात टीममधून क्रुणाल पांड्या आणि कुलदीप यादव आऊट होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या खराब गोलंदाजी भारताच्या पराभवाला जबाबदार ठरली. भारतीय फलंदाजानी धावांचा डोंगर उभा करुन दिलेला असतानाही गोलंदाजाना विशाल धावाही वाचवता आल्या नाही. फिरकीपटू कुलदीप यादव आणि क्रुणाल पांड्याने तर अक्षरश: धावांची खिरापत वाटली. क्रुणालने 6 ओव्हरमध्ये तब्बल 72 रन्स दिले. 12 हा त्याचा इकोनॉमी रेट होता. 72 धावांच्या बदल्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. दुसरीकडे कुलदीपनेही तोच कित्ता गिरवला. कुलदीपने 10 ओव्हर्समध्ये 84 रन्स दिले. त्यालाही 84 धावांच्या मोबदल्यात एकही विकेट्स मिळवता आली नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी कुलदीपला जोरदार लक्ष्य केलं. त्याच्या गोलंदाजीवर एकूण आठ षटकार इंग्लिश फलंदाजांनी लगावले. हे एकदिवसीय सामन्यातील कोणत्याही भारतीय गोलंदाजाला मारलेले सर्वांत जास्त षटकार आहेत. कुलदीप यादव आणि कृणाल पंड्या यांच्या जागी लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळू शकते. तसेच इंग्लंड च्या संघात कोणताही बदल होण्याची शक्यता दिसत नाहीये.