जगातील सर्वात मोठ्या स्टेडीयमवर विराटने वापरले ट्रम्पकार्ड;इंग्लंड थक्क !

![]() |
अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टेस्टला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये टॉसचा निर्णय इंग्लंडच्या बाजूनं लागला. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग घेण्याचा निर्णय घेतला.
तीन स्पिनरचा समावेश
अहमदाबादमध्ये सध्या सुरू असलेली टेस्ट ही डे-नाईट टेस्ट आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियात दोन बदल करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे जसप्रीत बुमराहचा मोहम्मद सिराजच्या जागी समावेश करण्यात आला. टीम इंडियातील दुसरा बदल मात्र आश्चर्यकारक होता.
डे-नाईट टेस्ट असल्यानं बॉल स्विंग होईल हे लक्षात घेऊन भारतीय टीम तीन फास्ट बॉलरसह उतरेल अशी अनेकांची अपेक्षा होती. अनुभवी उमेश यादवचा टीममध्ये समावेश होईल असा अनेकांचा अंदाज होता. पण भारतीय टीमनं कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा टीममध्ये समावेश केला. त्यामुळे तीन स्पिनरनं खेळण्याच्या डावपेचावर विराट कोहली ठाम असल्याचं टॉसपूर्वीच स्पष्ट झालं.
विराटनं वापरलं ट्रम्प कार्ड!
भारतीय टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं बॉलर्सचा कल्पक वापर करत इंग्लंडला गोंधळात टाकलं. इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहनं भारतीय बॉलिंगची सुरुवात केली. विराटनं सातव्या ओव्हरमध्ये पहिला बदल केला. विराटनं सातव्या ओव्हरमध्ये अनुभवी आर. अश्विनला बॉल न देता अक्षर पटेलला बॉल दिला.
अक्षर पटेलची ही दुसरीच टेस्ट आहे. मात्र अक्षरचं अहमदाबाद हे होम ग्राऊंड असल्यानं त्याला या मैदानात खेळण्याचा मोठा अनुभव आहे. यापूर्वीच्या टेस्टमध्येही त्यानं इंग्लंडच्या बॅट्समनला चांगलंच त्रस्त केलं होतं. त्यामुळे विराटनं ट्रम्प कार्डसारखा अक्षरचा वापर करत त्याला अश्विनच्या आधी बॉलिंग दिली. अक्षरनंही पहिल्याच बॉलवर जॉनी बेअरस्टोला आऊट करत टीम इंडियाला दुसरं यश मिळवून दिलं.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार टेस्ट मॅचची ही सीरिज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्यासाठी दोन्ही टीमना ही मॅच जिंकणं आवश्यक आहे.