भारतातील होळीच्या प्रथा, पद्धती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन
पौराणिक ग्रंथांमध्ये आपण साजरे करत असलेल्या प्रत्येक सणाची एक विशिष्ट अख्यायिका आहे.
तसेच प्रत्येक सणामागे वैज्ञानिक दृष्टिकोन देखील असतो. आपल्यातील काही लोक पौराणिक बाजूला झुकलेले असतात, तर काही वैज्ञानिक.
होळी हा रंगांचा उत्त्सव आपण सगळेच साजरा करत असलो तरीही, आता कुठेतरी ही संस्कृती लोप पावताना दिसत आहे.
बदलत्या काळात सण साजरे करण्याच्या पद्धतींमध्ये बदल होताना दिसतो आहे. असे असले तरी हा सण का साजरा करतात?…
याची माहिती असणे गरजेचे आहे…. होळी साजरी करण्यामागचा प्राचीन इतिहास म्हणजे, एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता
जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा, तसेच त्याला भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते.
परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते.
तो वेगवेगळ्या प्रकारे प्रल्हादाला विष्णूच्या भक्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असे.
वारंवार प्रयत्न करूनही यश न आल्याने हिरण्यकश्यपूने एक योजना बनवली आणि आपली बहीण ‘होलिका’ हिला बोलावले. होलिकेला अग्नीचे वरदान होते.
त्यामुळे राजाने होलिकेला प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले.
त्यानुसार होलिका आणि प्रल्हाद चितेवर बसले परंतु वरदानचा दुरुपयोग केल्याने होलिका स्वतःच भस्मसात झाली,अशी अख्यायिका आहे.
वाईट विचार, प्रवृत्तींना या दिवशी अग्निमध्ये भस्मसात करण्याची प्रथा भारतात रुजू झाली.
होलिका दहनचा दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. यामागे कृष्णाची कथा सांगितली जाते.
कृष्णाने राधेला रंग लावला आणि तेव्हापासून हा सण साजरा केला जातो, असे मानण्यात येते.
दुसरीकडे वैज्ञानिक बाजूने विचार केल्यास, होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ.
हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ. निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा हा काळ.
थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सूस्त झालेले असते. यामुळे शारिरीक थकवा आल्यासारखे वाटत असते.
वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो.
थंडीमुळे सूस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा, यासाठी होळी साजरी केली जाते.
होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. त्यामुळे वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळली जातात.
तसेच एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे हे बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.
या दिवशी आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून आनंदाने लोकांनी सहभागी व्हावं हाच उद्देश.
भारतात अशी साजरी होते होळी…
भारत हा अनेक संस्कृतींचा देश आहे..त्यामुळे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते.
कोकणात शिमगोत्सव केला जातो.
होळी म्हणजे मनुष्याच्या मनातील वाईट विचार आगीत जाळून राख होतात अशी येथे कल्पना आहे.
उत्तर भारतात होळीचे विशेष महत्त्व आहे. हा सण पाहण्यासाठी लोक व्रज, वृंदावन, गोकुळ अश्या ठिकाणी जातात.
व्रजला होळीच्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात. हि एक प्रसिद्ध प्रथा आहे.
बऱ्याच ठिकाणी फुलांनी देखील होळी खेळली जाते.इंदोर शहरात होळी अनोख्या प्रकारे साजरी केली जाते.
या दिवशी शहरातील सगळे लोक एकत्र निघून ‘राजवाडा’ या ठिकाणी जमतात आणि रंगीत पाण्याच्या टाक्या भरून , या पाण्याने होळी खेळली जाते,
तसेच नृत्य – संगीतासोबत आनंद आणि उत्साहात हा सण साजरा होतो. काही ठिकाणी भांग पिणे हा देखील एक होळीचा भाग आहे.
आदिवासी लोकांचीही होळी साजरी करण्याची विशिष्ट पद्धत आहे. मध्य भारत तसेच महाराष्ट्रात रंग पंचमीला अधिक महत्त्व आहे.
इथे लोक टोळी बनवून एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात आणि ” बुरा ना मानो होली है !” असे म्हंटले जाते.