भारतीय श्रीमंताच्या यादीत गौतम अदानी दुस-या स्थानावर
जगातील श्रीमंताच्या यादीत टॉप २० मध्ये,कोरोनाकाळात संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ
कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्था व सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला असताना या काळात देशातील अनेक उद्योगपतींची संपत्तीही झपाट्याने वाढली आहे. कोरोना संकट काळात रिलायन्स इंडस्ट्रीजने जगभरातील गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक मिळविण्यात यश मिळवले, तर ज्येष्ठ उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या ताज्या यादीमध्ये गौतम अदानी जगातील पहिल्या २० श्रीमंत लोकांच्या यादीत सामील झाले आहेत.
फोर्ब्सच्या रिअल-टाइम बिलिनर्सच्या ताज्या यादीनुसार, अदानीची संपत्ती मंगळवारी ६१.३ अब्ज डॉलर्सवर पोचली. या संपत्तीसह ते जगातील पहिल्या २० श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहे. गेल्या १ वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास एका वर्षात अदानीच्या संपत्तीत मोठी उडी आली आहे. एका वर्षाची कमाई पाहता त्याने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोसलाही पराभूत केले आहे. एका वर्षात, त्यांची संपत्ती १६.२ अब्ज डॉलर्सवरून ५०.५ अब्ज डॉलरवर गेली आहे.
गौतम अदानीचा व्यवसाय जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात पसरलेला आहे. खाणी, बंदरे, उर्जा प्रकल्प, विमानतळ, डेटा सेंटरखेरीज अदानी समूहही संरक्षण क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये आहे तसेच जगातील पहिल्या २० श्रीमंत लोकांच्या यादीत ते सामील आहेत तर भारतातील श्रीमंतांच्या यादीत ते दुसर्या क्रमांकावर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी यांच्यानंतर गौतम अदानी हे देशातील दुसर्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहेत.
फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या संपत्तीची आकडेवारी पाहिल्यास गौतम अदानी यांची ६ एप्रिल २०२१ रोजी संपत्ती ६१.३ अब्ज डॉलर्स इतकी आहे. अदानी यांची नेटवर्थ ४.४९ लाख करोड पेक्षा जास्त आहे.याशिवाय एका दिवसात अदानी यांच्या संपत्तीत तब्बल ३५,००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
अदानी ग्रुपच्या शेअर्सवर शेअर बाजाराचे वर्चस्व आहे. कंपन्यांच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या पाच व्यापार दिवसांविषयी बोलताना गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये ३६% वाढ झाली. अदानी एंटरप्रायजेसमध्ये ६.९२%, अदानी पॉवरने ४.९६%, अदानी ग्रीन एनर्जीने २.२३% वाढ नोंदवली. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेत अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे शेअर्स ५० टक्क्यांनी वाढले आहेत तर बीएसई मधील कंपनीची बाजारपेठ ७.७५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. १०० अब्ज डॉलर्सच्या बाजार भांडवलाच्या आकडेवारीला स्पर्श करणार्या अदानीची कंपनी देशातील तिसरी कंपनी बनली आहे.