पॉलिटीक्स

महाराष्ट्राला गरजेनुसार लसींचा पुरवठा करावा-राजेश टोपे यांची मागणी

केंद्राने शेजारील राज्यांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी निर्देश द्यावे-केंद्रीय आरोग्यमंत्र्याच्या बैठकीत मांडले मत

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा.

२५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत,

अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज विविध राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत राज्यांमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

त्यावेळी श्री. टोपे यांनी विविध मुद्दे मांडताना महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

लसीकरणाला गती मिळावी यासाठी केंद्र शासनाने मागणीप्रमाणे पुरवठा करण्यावर श्री. टोपे यांनी भर दिला.

यावेळी राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

यावेळी आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज ४ लाखांहून अधिक जणांना लसीकरण केले जात आहे.

वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रणासाठी लसीकरण जास्त उपायकारक असून राज्याने त्याला गती दिली आहे. राज्यातील लसी वाया जाण्याचे प्रमाणही खूपच कमी आहे.

राज्यात सध्याचा लसींचा साठा लक्षात केंद्र शासनाकडून तातडीने मागणी प्रमाणे पुरवठा होणे गरजेचे आहे.

कोवॅक्सिनची मागणी वाढल्याने त्याचाही अतिरीक्त पुरवठा करावा, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

राज्यात २५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली आहे.

आजच्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडेही या मागणीचा पुनरुच्चार केला.

राज्यात सध्या रुग्ण संख्या आढळतेय त्यात २५ ते ४० वयोगटातील संख्या अधिक आहे आणि या वयोगटातील नागरिकांना व्यवसायानिमित्त बाहेर पडावे लागते.

ही बाब लक्षात घेऊन २५ वर्षांवरील नागरिकांचा समावेश लसीकरणाच्या प्राधान्य यादीत करण्याची मागणी श्री. टोपे यांनी केली.

राज्यात रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनच्या मागणी वाढ होत आहे. राज्यात दररोज १२०० मेट्रीक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून

त्यापैकी ८० टक्के वापर वैद्यकीय कारणासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रालगतची जी राज्य आहेत जेथे ऑक्सिजनचा वापर जास्त नाही त्यांच्याकडून

ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला व्हावा यासाठी केंद्र शासनाने या राज्यांना निर्देश देण्याची विनंती श्री. टोपे यांनी यावेळी केली.

रेमडीसीवीर इंक्जेशनचा वापर राज्यात वाढला असून त्याची कृत्रिम टंचाई होऊ नये तसेच हे इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी महाराष्ट्राच्या मागणीनुसार पुरवठा करावा

यासाठी केंद्र शासनाने सहकार्य करण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्रातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन राज्यात नवीन स्ट्रेन आला आहे का, याबाबत राष्ट्रीय रोग नियंत्रण केद्रांकडून संशोधन होऊन मार्गदर्शन करण्यात यावे.

आरोग्य सेवेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातून निधी द्यावा,

व्हेंटीलेटर्सच्या १०० टक्के वापरासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात यावे, असे श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *