केमोथेरपी’ पासून होणार सुटका ; कोरोनानंतर आता कर्करोगावरही येणार लस
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. या महाभयंकर रोगावर आता उपचार उपलब्ध असले तरीही कर्करोग म्हटलं की आपल्या पोटात भीतीचा गोळा येतो. कर्करुग्णांना केमोथेरपी, रेडिओथेरपी यांसारख्या वेदनादायी उपचारांना सामोरे जावे लागते. मात्र आता कर्करुग्णांसाठी एक अतिशय आनंदाची वार्ता आहे. या रोगाच्या वेदनेतून कर्करुग्णांची सुटका होणार आहे. कारण येत्या दोन वर्षात कर्करोगावरील लस येणार असल्याचा दावा जर्मनीच्या संशधकांनी केला आहे. बायोएनटेक कंपनीचे सीईओ डॉ. उगर साहिन आणि त्यांची पत्नी डॉ. ओझलेम ट्युरेशी यांनी कोरोनावर मात करणारी ‘फायझर’ लस तयार केली आहे. ही लस सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये वापरली जात आहे. याच दांपत्याने आता कर्करोगावरील लस शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी ट्युमरविरोधात शरीराची रोगप्रतिकरक क्षमता वाढवण्याचे यशस्वी संशोधन केले आहे. जर आमच्या प्रयत्नांना यश आले तर येत्या दोन वर्षांत कर्करोगावरील लस उपलब्ध करून देऊ, असे या दोघांचे म्हणणे आहे. गेल्या २० वर्षांपासून कर्करोगावरील उपचार पध्दतीवर हे दोघे संशोधन करत आहेत. त्यांनी कोरोनावर विकसित केलेली लस ही ‘एम – आरएनए’ (रेबोन्युक्लिक ॲसिड) वर आधारित आहे. यामुळे पेशींमध्ये प्रथिने निर्माण केली जातात. त्याद्वारे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेला सुरक्षित अँटीबॉडीज तयार करण्यास प्रेरित करते. याच तंत्रावर कर्करोगावर आधारीत लस तयार केली जात आहे.
लवकरच प्रयोग केला जाईल
कोरोनावरील लस तयार करताना आम्ही एम-आरएनए वर आधारीत काही कर्करोगाच्या लसीही तयार केल्या आहेत. लवकरच त्याची क्लिनिकल ट्रायल करू असे ट्युरेशी यांनी सांगितले आहे. आजवर आम्ही केलेल्या संशोधनानुसार या लसीमुळे कर्करोगाची लागण होण्यापूर्वीच शरीरात त्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात आणि कर्करोगाविरुद्ध लढण्याची ताकद तयार होते.
ऑक्सफर्डच्या संशिधकांकडूनही होतेय लस निर्मिती
दुसरीकडे कोरोनवर लस तयार करणारे ऑक्सफर्डचे संशोधक प्रा. सारा गिल्बर्ट आणि प्रा. एड्रियन हील हेदेखील एम – आरएनए वर आधारित कर्करोगावरील लस तयार करत आहेत. फुप्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णावर या लसीची चाचणी करण्याची तयारी त्यांनी पूर्ण केली आहे. सुरुवातीला या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत कर्करोगाचा सामना करणाऱ्या रुगांना केमोथेरपी, रेडिओथेरपी यांसारख्या उपचारांच्या वेदनेतून मुक्तता मिळणार आहे. शिवाय केस गळणे, भूक मंदावणे, वजन घटणे यांसारख्या परिणामांपासूनही रुग्णांची सुटका होईल असे संशोधकांनी म्हंटले आहे.