केंद्र सरकार विकणार एमटीएनएलची मालमत्ता; लवकरच होणार लिलाव
खाजगीकरणाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे पुढचे पाऊल म्हणून आणि सरकारी उपक्रमांची स्थिती सुधारण्यासाठी दूरसंचार क्षेत्रातील सरकारी उपक्रम असलेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ची देशभरात असलेली मालमत्ता व जमीन यांची माहिती केंद्र सरकारने जमा केली आहे. याचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे.
एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले की विक्रीसाठी काढल्या जाणाऱ्या एमटीएनएलच्या मालमत्तांचा लिलाव एमएसटीसीने स्थापन केलेल्या ऑनलाइन ई-बिडिंग प्लॅटफॉर्मद्वारे केला जाईल. “एमटीएनएलच्या मालमत्तांसाठी बिडिंग एमएसटीसीमार्फत होईल, हा पहिलाच असा उपक्रम असेल,” असे देखील त्यांनी सांगितले.
या मालमत्तेचा मुंबईचा बोरिवली येथील शिंपोली, मुलुंड, वसई या भागातील एमटीएनएलच्या मालकीच्या जमिनीचा हे समावेश आहे. दिल्लीमध्ये देखील एमटीएनएल चे मालकीचे कार्यालय व दुकाने असलेल्या इमारती नोएडा येथे निवासी संकुल असून त्यांचाही खासगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लिलाव करण्यात येईल.
मालमत्तेचा लिलाव करताना त्यांच्या पायाभूत किमती काय असाव्यात हे ठरवायला आणखीन दोन ते तीन महिने लागणार असून त्यानंतर लिलाव सुरू होईल. या सर्व प्रक्रियेचे सूत्र केंद्रीय निर्गुंतवणूक खात्याकडे आहेत.