पॉलिटीक्स

माणुसकी आणि बंधुत्वाच्या भावनेतून कर्तव्य करा :अजित पवार

पोलिस उपनिरिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना, नियमानं, कायद्यांनं वागा. परंतु, कायदा पाळताना, तुमच्यातली माणुसकीची, बंधुत्वाची भावना हरवू नका. तुम्ही घातलेल्या खाकी वर्दीच्या आत, जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंतच तुमच्या खांद्यावरच्या स्टारना किंमत आहे. हे कायम लक्षात ठेवा, असे यावेळी मार्गदर्शन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, मला आनंद आहे की, आपल्यापैकी अनेक जण शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय, सामान्य कुटुंबातून आला आहात. शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, सामान्य माणसाची दु:ख, अडचणी काय असतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. रोज कष्ट करुन रोजंदारीवर पोट भरणाऱ्या लोकांच्या वेळेचं, श्रमाचं मोल तुम्ही समजलं पाहिजे. ही सामाजिक जाणीव तुमच्याकडे असेल तरंच, पोलिस स्टेशनमध्ये मदतीसाठी आलेल्या सामान्य माणसाला तुम्ही न्याय देऊ शकाल. तुम्ही पोलिसांचे, शासनाचे प्रतिनिधी म्हणून समाजात वावरणार आहात. समाजातील सामान्य माणसाशी तुमचा संबंध येणार आहे. या सामान्य माणसाशी तुम्ही बोलता, त्यांच्याशी कसे वागता, त्याच्या प्रश्नांकडे कसे बघता, ते कसे सोडवता, यावरंच तुमची, तुमच्या वरिष्ठांची आणि शासनाची प्रतिमा तयार होत असते.
पोलिस स्टेशनमध्ये न्याय मागण्यासाठी येणाऱ्या, सामान्य माणसांचे प्रश्न तुमच्यासाठी किरकोळ, किंवा तुम्हाला लहान वाटले, तरी सामान्य माणसासाठी, त्याच्या कुटुंबासाठी ते प्रश्न खुप मोठे असतात. या सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. सगळेच प्रश्न कायद्याने, नियमाने सुटतात असं नाही, परंतु माणुसकीच्या भावनेतून अनेक प्रश्न सोडवले जावून शकतात, या सकारात्मक विचारातून तुम्ही काम केलं पाहिजे. आपण सर्व पदवी आणि पदवीपेक्षा अधिक शिक्षण घेतलेले आहात. एमपीएससी परीक्षा पास होऊन पोलिस सेवेत आला आहात. या यशामागे अनेक वर्षांचे कष्ट, मेहनत, परिश्रम आहेत. संयमही मोठा आहे. त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. परंतु, हे यश तुमच्या एकट्याचं नाही, तुमचे आई-वडिल, बहिण-भाऊ, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शेजारी, सहकारी, समाजाचं या यशात योगदान आहे, तुमच्या यशामागे अनेकांचा त्याग आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे समाजाला जेव्हा जेव्हा तुमची मदत लागेल, तेव्हा तेव्हा ती देऊन, समाजाच्या ऋणाची परतफेड करण्याचं कर्तव्य तुम्ही पार पाडाल, असा विश्वास व्यक्त करतो.
तुमच्या या यशाबद्दल तुमचे आई-वडिल, बहिण-भाऊ, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शेजारी, सहकारी, सर्वाचं मी अभिनंदन करतो. त्यांचेही आभार मानतो. आज पोलिस उपनिरिक्षक म्हणून सेवेत आलेले तुम्ही सर्वजण, राज्याची कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यात मोलाचं योगदान द्याल. आपली सेवा प्रामाणिकपणे कराल.
तुम्हा सर्वांना माझं आवाहन आहे की, आपली बांधिलकी ही भारतीय राज्यघटनेशी, नियम व कायद्यांशी असली पाहिजे. जात-पात, धर्म-पंथ, वैचारिक बांधिलकी, राजकीय-सामाजिक-धार्मिक विचारसरणी या गोष्टींना वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात स्थान असणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. याउपरही वैयक्तिक आस्थांचं पालान करायचं असेल तर ते घराच्या उंबरठ्याच्या आत करावं, वैयक्तिक आस्थांचं प्रदर्शन टाळावं, यातूनच देश पुढे जाण्यास मदत होणार आहे, असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनीही प्रशिक्षणार्थी यांचे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्वागत करुन पुढील सेवाकाळामध्ये पोलीस दलास आणि जनतेस योगदान देणार आहात.चांगल्या गोष्टींचा आदर करुन वाईट गोष्टींपासुन नेहमी दुर रहा असा सल्ला देवुन जनतेला सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे.पोलीसांवर कोणी हात उचलला तर त्यास योग्यरितीने प्रत्युतर देण्यासाठी तयार असावे.आपल्या कर्तव्यामधुन आणि आचरणामधुन ओळख निर्माण झाली पाहीजे असे संबोधन करुन पुरस्कारार्थी प्रशिक्षणार्थी यांचे अभिनंदन व्यकत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोविड -१९ या विषाणुचा प्रार्दुभाव होवु नये, याकरिता मर्यादित मान्यवरांचे उपस्थितीमध्ये समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. हा दीक्षांत समारंभ प्रशिक्षणार्थी यांचे पालक, मित्रपरिवार व इतरांना पाहता यावा, याकरिता महाराष्ट्र पोलीस अकादमीने या you tube लिंकव्दारे दिक्षांत समारंभाचे थेट प्रक्षेपण केले होते. विशेष प्राविण्य मिळविलेल्या विविध परितोषिक प्राप्त प्रशिक्षणार्थीना कोविड -१ ९ च्या अनुषंगाने प्रत्यक्ष बक्षिस वितरण सोहळा पार न पडता पुरस्कारार्थी यांची नावे पुकारुन सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणुन मानाची रिव्हॉल्वर ( Revolver of Honour ) , उत्कृष्ट आंतरवर्ग प्रशिक्षणार्थी , सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी म्हणुन अहिल्यादेवी होळकर कप या तीनही पुरस्काराची मानकरी म्हणुन शुभांगी चंद्रकांत शिरगावे या महिला प्रशिक्षणार्थीस सन्मानित करण्यात आले. तसेच सलीम शेख या प्रशिक्षणार्थींना उत्कृष्ट बाह्यवर्ग प्रशिक्षणार्थी म्हणुन परितोषिक देण्यात आले. तर अविनाश वाघमारे या प्रशिक्षणार्थी अधिकारी यांस व्दितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणुन सन्मानित करण्यात आले.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *