एमजीएम परिसरात आढळला दुर्मिळ ‘तंबूला’ पक्षी
एमजीएम फोटोग्राफी विभागाच्या सुकन्या हिवर्डेने केले कॅमेऱ्यात कैद
औरंगाबादमध्ये अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा ‘तंबूला’ हा पक्षी आढळून आला आहे. एमजीएम फोटोग्राफी विभागाची विद्यार्थीनी सुकन्या हिवर्डेने या पक्षाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. लाल छाती आणि काहीसा राखट रंगाचा हा पक्षी एमजीएम परिसरात आढळून आला. सामान्यपणे तंबूलाचे वास्तव्य यूरोप आणि मध्य आशियामध्ये असते आणि प्रजननासाठी हिवाळ्यात दक्षिण आशिया भागात येत असतो. मात्र, तो ऐन फेब्रुवारी महिन्यामध्ये औरंगाबादेत आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एमजीएम परिसर हा जैवविविधतेने नटला असून या ठिकाणी अनेक प्रकारची वृक्षसंपदा तसेच पक्ष्यांचे वास्तव्य आहे. यापूर्वीही या ठिकाणी अशा प्रकारचे अनेक दुर्मिळ पक्षी आढळून आले आहे. सुकन्या हिवर्डे ही प्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमजीएम फोटोग्राफी विभागामध्ये शिकत आहे. फोटोग्राफीचा सराव करत असताना मागील आठवड्यात तिला एका झाडावर हा पक्षी बसलेला दिसून आला. त्यामुळे तिने तत्काळ त्याला कॅमेऱ्यात कैद केले.