इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर
टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठीच्या तीन पात्रता स्पर्धांपैकी एक असलेली इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा देशातील करोना साथीमुळे सोमवारी लांबणीवर टाकण्यात आली आहे.‘सुपर ५००’ दर्जाची इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा ११ ते १६ मे या कालावधीत नवी दिल्लीमधील बंदिस्त संकुलात आयोजित करण्यात येणार होती. परंतु सद्यस्थितीतील आव्हानांमुळे भारतीय बॅडमिंटन संघटनेपुढे स्पर्धा लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही, असे संघटनेचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितले.
‘‘जागतिक बॅडमिंटन महासंघ, दिल्ली सरकार आणि अन्य खेळाडूंच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आमच्या अनेक बैठका झाल्या. त्यानुसार संघटनेने हा निर्णय घेतला आहे,’’ असे सिंघानिया यांनी सांगितले.
२०२०मधील इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा आधी मार्चऐवजी डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. नंतर ती रद्द करण्यात आली. ‘‘ही स्पर्धा दुसऱ्यांदा लांबणीवर टाकावी लागत आहे. परंतु परिस्थिती सुधारल्यावर आम्ही स्पर्धा घेऊ,असे सिंगानिया यांनी सांगितले.नविन वेळापत्रक अजून ठरवण्यात आलेले नाही. जागतिक बॅडमिंटन महासंघाकडून नविन वेळापत्रक सुनिश्चित करण्यात येईल.