डॉ. विलास सपकाळ एमजीएम विद्यापीठाचे नवे कुलगुरू
मावळते कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांच्याकडून स्वीकारला पदभार
डॉ. विलास सपकाळ यांची एमजीएम विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली असून मावळते कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांच्याकडून सोमवारी पदभार सांभाळला.
या वेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, गांधी विचारांचे अभ्यासक आणि एमजीएमचे एमिरेट्स प्रोफेसर मार्क लिंडले,
उद्योजक रणजीत कक्कड, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, परीक्षा नियंत्रक कर्नल डॉ. प्रदीपकुमार, सर्व अधिष्ठाता आणि विभागप्रमुख आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासनाने २०१९ मध्ये एमजीएमला स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठाचा दर्जा बहाल केला. प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी एमजीएम विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून काम पाहिले.
त्यांचा कार्यकाळ संपल्याने डॉ. विलास सपकाळ यांची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या छोटेखानी समारंभात नवे कुलगुरू डॉ. सपकाळ म्हणाले, एमजीएमने कुलगुरू म्हणून दिलेली ही संधी मोलाची आहे मात्र त्यापेक्षाही अधिक आव्हानांची आहे.
कोणतीही एक व्यक्ती विद्यापीठ चालवू शकत नाही. त्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करावी लागते. त्यात यंत्रणेनं सहभागी होऊन काम करावे लागते. या विद्यापीठाला तर अशा महात्म्याचं नाव आहे ज्यांनी ते आपल्या कर्तृत्वाने अजरामर केले आहे.
त्यांच्या नावाचे, येथील विचाराचे, व्हिजनचे व्रत हाती घेऊन संशोधन आणि सृजनशीलतेच्या दृष्टीने मी काम करणार असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
तर, मावळते कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, मागील दोन वर्षांच्या कुलगुरूपदाच्या कार्यकाळात एमजीएम विद्यापीठात आम्ही ४८ नवे अभ्यासक्रम सुरू केले.
जागतिक स्तरावरील संशोधक नानासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात एमजीएम सेंटर फॉर मल्टीडिसिप्लिनरी, विद्यार्थ्यांत विद्यार्थीदशेतच उद्योजकतेचे बीज रोवण्यासाठी एमजीएम सेंटर फॉर आंत्रप्रीनरशीप, सेंटर फॉर सायकोलॉजीकल काऊन्सेलिंग आदींची सुरुवात केली.
शेतकऱ्यांप्रमाणेच बीज रोवण्याचे काम केले. ते बीज भविष्यात नक्कीच चांगली फळ देईल. मुल्ये, दर्जा आणि गुणवत्तेच्या बाबतीत एमजीएम विद्यापीठ जगात नावलौकिक मिळवेल, असा आशावादही डॉ. गव्हाणे यांनी व्यक्त केला.

कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, डॉ. सुधीर गव्हाणे यांनी कुलगुरू या नात्याने आमच्या संस्थेतील विविध महाविद्यालयांचा विद्यापीठाच्या रुपाने आवाका बांधण्यात मोलाचे काम केले आहे.
नवे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांना आता या विद्यापीठाला एका नव्या उंचीवर न्यायचे आहे. त्यासाठी आमची संपूर्ण यंत्रणा कायम त्यांच्यासोबत असेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांनी प्रास्ताविक तर डॉ. आशा देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
नवे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांचा परिचय
डॉ. सपकाळ यांनी आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंग या विषयात एम.टेक, पी.एचडीचे शिक्षण घेतले आहे.
सुमारे ३२ वर्षांपासून ते अध्यापन करत असून २०१० ते २०१४ या काळात ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते.
शिवाय, त्यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही काम पाहिले आहे.
संशोधन क्षेत्रातही डॉ. सपकाळांचे योगदान मोठे आहे. युजीसी, एआयसीटीई, डीएसटी, एमएनईसच्या विविध संशोधन प्रकल्पांसाठी त्यांनी काम केले आहे.
शिवाय, एआयसीटीईच्या राष्ट्रीय मान्यता मंडळात तसेच नॅकसाठीही त्यांनी तज्ञ म्हणून काम केले आहे.