IPL MI vs SRH:शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईचा विजय; हैदराबाद ऑलआऊट
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात शेवटी मुंबईनेच बाजी मारली. बुमराह आणि बोल्टच्या जोडगोळीने शेवटच्या चार षटकात जबरदस्त कामगिरी करत एकूण तीन बळी घेतले.
हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी मुंबईला धमाकेदार सुरूवात करून दिली.
या दोघांनी ५ षटाकत ४८ धावा केल्या. पण सातव्या षटकात विजय शंकरने रोहित शर्माला ३२ धावांवर बाद केले. त्याने २५ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव १० धावांवर बाद झाला.
तर जम बसलेला सलामीवीर डी कॉक ४० धावांवर माघारी परतला. मधळ्या फळीतील इशान किशनला आज धावाच करता आल्या नाहीत. त्याने २१ चेंडूत फक्त १२ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिकला पुन्हा एकदा अपयश आले. तो फक्त ७ धावा करू शकला.
अखेरच्या काही षटकात कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला २० षटकात ५ बाद १५० पर्यंत मजल मारता आली. पोलार्डने २२ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकारासह नाबाद ३५ धावा केल्या. हैदराबादकडून विजय शंकरने २ तर मुजिबने दोन विकेट घेतल्या. खलिल अहमदने एक विकेट घेतली. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील फलंदाजांना पुन्हा एकदा धावा करण्यात अपयश आले.
151 धावांचं माफक आव्हान उभं केलं होतं. परंतु मुंबईने दिलेलं हे आव्हान हैदराबादच्या संघाला पेलवलं नाही. हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने अवघ्या 22 चेंडूत 43 धावांची आक्रमक खेळी केली.
सोबत कर्धणार डेव्हिड वॉर्नरने 36 धावांचे योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त हैदराबादच्या कोणत्याही फलंदांजाला चमकदाक कामगिरी करता आली नाही. परिणामी हैदराबादला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
दुसरीकेड हैदराबादवर मात करत मुंबईने गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. आजच्या सामन्यात मुबईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत 150 धावांचा बचाव केला.
मुंबईकडून राहुल चाहरने 4 षटकात 19 धावा देत 3 तर ट्रेंट बोल्टने 3.4 षटकात 28 धावा देत 3 बळी घेतले. बुमराह आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तर हार्दिक पंड्याने हैदराबादच्या दोन फलंदाजांना धावबाद केलं.