हाफकिनमध्ये लसनिर्मितीसाठी केंद्र शासनाची मान्यता,भारत बायोटेककडून हस्तांतरण पद्धतीने बनणार कोवॅक्सीन
देशात वाढत्या कोरोनाच्या रुग्णामुळे वैद्यकीय सेवा अपुरी
लस मिळत नसल्यामुळे रुग्णांचे जीव टांगणीला, निर्णयामुळे दिलासा मिळणार?
हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे.
आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते,
असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबाबत पत्र पाठवले आहे.
वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे.
सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरू करावे तसेच
हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी,
असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हाफकिन संस्था काय आहे?
हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था मुंबई परळ येथे आहे .
“प्लेग रिसर्च लॅबोरेटरी” नावाच्या बॅक्टेरियोलॉजी रिसर्च सेंटर म्हणून डॉ. वाल्डेमार मोर्डेकाई हाफकिन यांनी १० ऑगस्ट १८९९ रोजी याची स्थापना केली.
हे आता विविध मूलभूत आणि उपयोजित बायो-वैद्यकीय विज्ञान सेवा देते. संस्थेने मार्च २०१४ मध्ये सूक्ष्म जीवशास्त्रातील संशोधन
आणि घडामोडी प्रदर्शित करण्यासाठी संस्थेच्या आवारात एक संग्रहालय उघडले आहे आणि संस्थेच्या इतिहासाची माहिती दिली जाते.
संस्थेला २०१२ मध्ये आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. हाफकिन संस्था ही पोलिओ, रॅबीज लसींचे उत्पादन करते.
घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, क्षय, पोलिओ आणि रेबीज या रोगां विरुध्द जिवाणुजन्य आणि
विषाणुजन्य लसींचा व्यापक वैविध्याच्या विकासात आणि उत्पादनात अग्रगण्य भुमिका बजावली.
एच.बी.पी.सी.एल ही भारतातील प्रतिसर्प विष रक्तलसीच्या उत्पादनात अग्रेसर आहे आणि सदर कंपनी १९४० सालापासुन त्याचे उत्पादन करते.
एच.बी.पी.सी.एल ने देशात १९४५ सालापासुन प्रशुष्कीत प्रतिसर्प विष रक्तलसीच्या उत्पादनाचा देखील प्रारंभ केला.
पुर्वी सदर कंपनी प्रतिसर्प विष रक्तलसीची देशातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी होती
आणि ती देशातील एकुण उत्पादनाच्या ६० ते ७० टक्के उत्पादन करीत होती.
एच.बी.पी.सी.एल कंपनीने तयार केलेल्या प्रतिसर्प रक्तलसीची जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या मार्फत निर्यात केली जाते.