थरारक सामन्यात मुंबईची कोलकतावर १० धावांनी मात
आयपीएल 2021 च्या 5व्या सामन्यात मुंबई चा कोलकाता वर 10 धावांनी विजय. पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये चेन्नईतल्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला. या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार इयॉन मॉर्गनने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा संघ अवघ्या 152 धावांमध्ये ऑल आऊट झाला. मध्यमगती गोलंदाज आंद्रे रसेलने अवघ्या 2 षटकात 15 धावा देत मुंबईचे पाच फलंदाज बाद केले आहेत. त्याला पॅट कमिन्सने 2, शाकीब अल हसनने 1, प्रसिद्ध कृष्णाने 1 बळी घेत चांगली साथ दिली. दरम्यान, मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. त्याला रोहित शर्माने 43 धावा देत चांगली साथ दिली. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईने कोलकात्याला 153 धावांचे आव्हान दिले होते. परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत हा सामना कोलकात्याच्या हातून हिरावला आहे. मुंबईकडून या सामन्यात राहुल चाहरने चार षटकात 27 धावा देत 4 बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने 4 षटकात 27 धावा देत 2 बळी घेत मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका निभावली. कोलकात्याकडून या सामन्यात सलामीवीर नितीश राणाने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर शुभमन गिलने 33 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोलकात्याच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.