एमजीएम वर्ल्डमहाराष्ट्र

माझे गीत विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणार ही भावनाच प्रेरणादायी : कविता कृष्णमूर्ती

एमजीएम विद्यापीठ गीताचे थाटात लोकार्पण

मी 50 वर्षांपासून संगीतक्षेत्रात कार्यरत आहे. खूप गाणी गायली पण, काही क्षण खूप प्रेरणादायी असतात आणि आजचा एमजीएम विद्यापीठ गीत लोकार्पणाचा क्षणही त्यापैकीच एक आहे. कारण, एमजीएम विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांचे हजारो विद्यार्थी शिकत आहेत, पुढेही शिकतील. अशा हजारो विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असे विद्यापीठ गीत मी गायले ही भावना माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आगामी पिढ्यांसाठी हे गीत आणि एमजीएम विद्यापीठ कायम प्रेरक राहो, अशा शब्दांत ज्येष्ठ पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांनी भावना व्यक्त केल्या. एमजीएम विद्यापीठ गीताच्या लोकार्पणप्रसंगी त्या बोलत होत्या.
या वेळी गीतकार संजय मोहोड, मुक्ता भिडे, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सुर्यवंशी, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, रणजीत कक्कड आदी उपस्थित होते. ‘अप्पो दीप भव’ हे एमजीएम विद्यापीठाचे घोषवाक्य असून याच धर्तीवर प्रसिद्ध गीतकार संजय मोहोड यांनी विद्यापीठ गीताची रचना केली आहे. तर कविता कृष्णमूर्ती यांनी स्वरबद्ध आणि दिवंगत संगीतकार नरेंद्र भीडे यांनी संगीतबद्ध केले आहे.
ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमात गीतकार प्रा. संजय मोहोड म्हणाले, गौतम बुद्ध, गुरुनानक, संत कबीर, महावीरांसारख्या संतांनी तर आईन्स्टाईनसारख्या विचारवंत आणि शास्त्रज्ञांनी त्यांची मांडणी विशिष्ट सुत्रात केली. सुत्र हे संक्षिप्त असले तरी ते मार्गदर्शक असते. नेमका हाच धागा पकडून एमजीएम विद्यापीठ गीताचे सुत्र बांधण्यात आले. ‘प्रत्येकाने स्वयंप्रकाशित होऊन इतरांना प्रकाशित करावे. तू स्वरुप तर आहेसच पण तुला जगाचे रुपही बघायचे आहे आणि ते रुप तुझ्यातच विराजित आहे. त्यामुळे या आंतरपरस्पर राहून तु समाजाचे भले कर. जगातील संपूर्ण ज्ञान देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि त्या ज्ञानाचा लाभ तू घे. हे सर्व काही घडल्यास सर्वांचे कल्याण होईल. समाजाचे कल्याण असलेला पथदर्शक तुला व्हायचे आहे,’ असा या गीताचा अर्थ असल्याचेही प्रा. मोहोड यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे सर म्हणाले, एमजीएम विद्यापीठाच्या गीताचा लोकार्पण सोहळा हा एक ऐतिहासिक क्षण आहे. कारण, विद्यापीठात अनेक पिढ्या येतात आणि त्या पिढ्यांपर्यंत विद्यापीठाची मुल्ये, तत्वज्ञान, विचार, दिशा पोहोचवण्याचे काम विद्यापीठ गीतातून होते. ‘अत: दीप भव’ हा केवळ विचार नव्हे तर तत्वज्ञान आणि दिशा असून यास कविता कृष्णमूर्तींचे स्वर लाभणे गौरवशाली आहे. त्यामुळे एमजीएम विद्यापीठात येणाऱ्या भावी सर्व पिढ्यांकडून या गीताच्या निर्मितीमागे झटणाऱ्या हातांचे मी आभार मानतो. दरम्यान, या कार्यक्रमास एमजीएमचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि अन्य अनेक लोक उपस्थित होते. एमजीएम रेडिओचे प्रमुख देवाशिष शेडगे यांनी सूत्रसंचालन केले.

संगीतकार नरेंद्र भिडे यांच्या आयुष्यातील शेवटचे गीत

या गीताबाबतची आठवण सांगताना प्रा. मोहोड म्हणाले, संगीतकार नरेंद्र भिडे यांच्यासोबत मी जवळपास ६० गाणी केली. त्यांनी आजवर कधीच सर्व साऊंड इंजिनिअरला एकत्र बोलावून गाणे ऐकले नव्हते. मात्र, एमजीएमचे गीत तयार झाल्यानंतर त्यांनी सर्वांना बोलावून हे गीत ऐकायला लावले आणि गीत किती सुंदर बनले आहे, याविषयी भावना व्यक्त केली. ही भावना खूप मोलाची आहे. दुर्देवाने दुसऱ्याच दिवशी नरेंद्र भीडे यांनी जगाचा निरोप घेतला. हे गीत त्यांनी उशीरा रात्री स्टुडिओत ऐकले आणि घरी गेले. त्यानंतर मात्र कधी परत स्टुडिओत आलेच नाही.

कुलपतींनी सांगितली एमजीएम विद्यापीठ गीताच्या निर्मितीमागील कथा

एमजीएम विद्यापीठ गीताच्या निर्मितीमागील कथा कुलपती अंकुशराव कदम यांनी सांगितली. ते म्हणाले, एकेदिवशी सकाळी मी घराच्या व्हरांड्यात बसलो होतो तेव्हा प्रा. संजय मोहोड तिथे आले. बोलता बोलता त्यांनी एमजीएम विद्यापीठातील लोगोमध्ये असलेल्या ‘अप्पो दीपो भव’ वाक्याबद्दल विचारले. मी त्याबद्दल सांगताच त्यांनी यावर विद्यापीठ गीत बनवण्याची संकल्पना मांडली. त्यात मीसुद्धा काही ओळी टाकल्या. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी शब्दबद्ध केलेली रचना वाद्यसंगीतासह मला ऐकवली. ते माझ्या हृदयाला भिडून गेले. हे गीत काहीही करून कविता कृष्णमूर्तींच्याच आवाजात बनवायचे असा निर्धारही मोहोड यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, कविताजींनी बंगळुरूमध्ये गाण्याची रेकॉर्डिंग केली आणि नरेंद्र भिडेंनी त्याचे पुण्यातील स्टुडिओत संगीत संयोजन केले आणि एक उत्तम गीत आकारास आले.

विद्यापीठ गीत

अत्त दिप भव भव प्रदिप भव, स्वरुप रुप भव हो
ज्ञान सब्ब विज्ञान सब्ब भव, सब्ब दीप भव हो
अत्ताहि अत्त नो नाथो, अत्ताहि अत्त नो गति
अत्त मार्गपर अक्रमादसे है तुझे चलना, सब्ब का कल्याण हो, वो कार्यकुशल करना
सब्ब का उत्तम मंगल, पथप्रदर्शक हो, अत्त दिप भव भव प्रदिप भव
स्वरुप रुप भव हो, ज्ञान सब्ब विज्ञान सब्ब भव
सब्ब दीप भव हो
बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.

एमजीएम विद्यापीठ गीत ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

एमजीएम विद्यापीठ गीत लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *