ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल मिळत नसल्याने विद्यार्थिनीने संपविले जीवन
टीम यंगिस्तान (अकोला) :सध्या शाळा आणि महाविद्यालय घेत असलेल्या ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल मिळू न शकल्या कारणाने अभ्यास होत नाही म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाच्या बिकट परिस्थितीसमोर संपूर्ण राज्य हतबल ठरत आहे. अशा परिस्थितीमध्येही शाळा व महाविद्यालये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देत आहे . परंतु घरची गरीब परिस्थिती आणि ऑनलाइन शिक्षणासाठी अनुपलब्ध असलेले पर्याय यामुळे विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले आहे.कु पायल मोहन गवई असे या विद्यार्थिनींचे नाव आहे.
घरात अठराविश्वे दारिद्र्य,ऑनलाइन अभ्यास करायला मोबाईल नाही,येत्या २३ एप्रिल पासून दहावीचे पेपर होणार,घरात अँड्रॉइड मोबाईल घेऊन देण्याची परिस्थिती नाही या नैराश्यातून अकोल्यातील भीम नगर, जुने शहर अकोला येथील रहिवासी असलेली कु.पायल मोहन गवई हीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याविषयी योग्य कारवाई करण्याकरिता गिव्ह विंग्स फाउंडेशन अँड चारिटेबल सोसायटी अकोल्याचे संस्थापक अध्यक्ष_आशुतोष शेगोकार यांनी पालकमंत्री मा.ओमप्रकाश उर्फ बच्चु भाऊ कडू यांना निवेदन सादर केले. त्यांच्या प्रयत्नातून पालकमंत्र्यांनी कु. पायलच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली व कुटुंबाला आर्थिक मदत केली.या कुटुंबाला शक्य तो न्याय मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला.यावेळी माझी पोर मेली, दुसऱ्या कुणाची मरू नये अशी मृत कु. पायलच्या वडिलांनी पालकमंत्र्यांना विनंती केली.
पुढे बोलताना ते म्हणाले आज दिनांक ५ एप्रिलला पायलच्या कुटुंबियांना भेट देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला. व भविष्यात कुठलाही गरजू विद्यार्थी या सुविधेपासून वंचित राहू नये यासाठी अभियान हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.