बचत योजनांवरील व्याजदरकपातीचा निर्णय हा चुकीने
अर्थमंत्र्याचा यू-टर्न
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी गुरुवारी सांगितले की, सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय मागे घेतला,१ एप्रिल पासून हे नवीन व्याजदर तिमाहीत लागू होणार होते तसेच ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत जे व्याज दर होते तेच दर आणण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.विशेष म्हणजे हा आदेश चुकीने जारी झाला होता असे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले.
ज्यांनी लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली त्यांना हा धक्का बसला असून सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि एनएससी (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र) यासारख्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात १.१ टक्के कपात केली. ही कपात 1 एप्रिलपासून २०२१_२२ च्या पहिल्या तिमाहीत केली गेली.याबाबत सीतारमण यांनी गुरुवारी सकाळी ट्वीट केले की, “भारत सरकारच्या छोट्या बचत योजनांवरील व्याज दर २०२०-२०२१ च्या शेवटच्या तिमाहीत होता तसाच राहील, म्हणजेच जो मार्च २०२१ मध्ये होता तोच दर असेल”.
वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पीपीएफवरील व्याज ०.७ टक्क्यांनी कमी करून ६.४ टक्क्यांवर आणले गेले, तर एनएससीवरील व्याज ०.९ टक्क्यांनी कमी करून ५.९ टक्के केले. छोट्या बचत योजनांवरील व्याज तिमाही आधारावर सूचित केले जाते.
याआधी एक वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याजात जास्तीत जास्त कपात १.१ टक्के इतकी केली गेली होती. यावेळी व्याज ५.५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.