सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला रुग्णालयात भरती केलं आहे. सचिनला 27 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. मात्र पुढील उपचारांसाठी मी रुग्णालयात दाखल होत आहे, अशी माहिती त्याने ट्विट करुन दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यावर तो घरातच क्वारंटाईन होता. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. मात्र आज ट्विट करत त्याने आपण रुग्णालयात दाखल होत असल्याचं सांगितलं आहे. सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाल्यानंतर जगभरातील त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या तसंच त्याची तब्येत लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, अशा मनोकामना व्यक्त केल्या. आजच्या ट्विटच्या माध्यमातून सचिनने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. सचिनने ट्विट करत सांगितलंय, “शुभेच्छा आणि प्रार्थनेसाठी आभारी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मी रुग्णालयात दाखल होत आहे. मला आशा आहे की पुढील काहीच मी घरी परतेन. तुम्हीही तुमची काळजी घ्या, सुरक्षित रहा…”आज भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकून बरोबर 10 वर्ष पूर्ण होत आहेत. याच संघाचा सचिन एक भाग होता. याच दिवसाचं निमित्त साधून सचिनने संपूर्ण भारतवासियांना तसंच संघ सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.