चतुर्थीला औरंगाबादमध्ये लोकांची गर्दी,लॉकडाऊनचा फज्जा!
प्रशासन हतबल,गर्दी अनियंत्रित
31मार्च 2021, औरंगाबाद
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना औरंगाबादमध्ये प्रशासनाचा गलथान कारभार दिसून आला.
खरतर मागील पंधरा दिवसांपासून रोज ३० हजार पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. रोज ३०० पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागत आहे. कालच केंद्र शासनाने देशातल्या १० अशा शहरांची यादी जाहीर केली ज्या शहरांमध्ये देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत.एकीकडे महाराष्ट्र आणि देशभरात लॉकडाऊनची चर्चा सुरू असताना आज औरंगाबाद येथे सिडको एन १ परिसरात असणाऱ्या भक्ती मंदिर( काळा गणपती) मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती. संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने शेकडो भाविक कुठल्याही फिजिकल डिस्टनसिंगच्या नियमांचं पालन न करता गर्दी करून उभे होते.
खरतर कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ३० तारखेपासून दहा दिवसांच्या लॉक डाऊन ची घोषणा केली होती, पहिल्यांदा हा लॉकडाऊन एक दिवस पुढे ढकलण्यात आला आणि त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि काही नागरिकांच्या विरोधामुळे हा कडक लॉकडाऊन मागे घेण्यात आला. मंगळवारी रात्री दहा वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉक डाऊन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. पण जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन असेल,सांगण्यात आले होते.
अंशतः लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर शहरातील सगळी मंदिर, सार्वजनिक जागा बंद असताना भक्तीनगर येथील गणेश मंदिरात इतकी गर्दी कशी जमली व प्रशासनाने याकडे लक्ष का दिले नाही ? असा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय.