जागतिक तापमानवाढ
बदलत्या काळात जागतिक तापमानवाढ ही एक प्रमुख समस्या बनली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीला जागतिक तापमानवाढ (global warming) म्हणतात. २००५ साली केलेल्या अभ्यासात मागील १०० वर्षांच्या काळात जागतिक स्तरावर सरासरी तापमानात ०.६०° से. ते १०° से. एवढी वाढ आढळून आली आहे. ‘हरितगृह वायूंचे’ वाढलेले प्रमाण त्याला कारणीभूत आहे. या वायूंमध्ये बाष्प, कार्बन डाय-ऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड, ओझोन आणि सीएफसी इत्यादींचा समावेश असतो. इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या आंतरराष्ट्रीय मंडळाने असा निष्कर्ष काढला आहे की, विसाव्या शतकाच्या मध्यापासून तापमानात झालेली वाढ ही मनुष्यनिर्मित आहे.एकविसाव्या शतकात जागतिक सरासरी तापमान १९९० च्या तुलनेत सुमारे १.४०° ते ५.८०° से. वाढण्याची शक्यता आहे. आजच्या घडीला हरितगृृह वायूंचे प्रमाण स्थिर राहिले असले, तरीही पुढील हजार वर्षे ही तापमानवाढ चालूच राहील. एखादया ठिकाणच्या परिसंस्थेत तेथील सजीवांबरोबरच इतर भौतिक घटकांचाही समावेश होतो. त्यामुळे मानवी समाज आणि निसर्गातील परिसंस्था वेगाने होणाऱ्या हवामानातील बदलांशी जुळवून घेऊ शकणार नाहीत. या तापमानात किती वाढ होईल, पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांत हे तापमान किती असेल आणि त्यामुळे कोणकोणते बदल होतील, यांबाबत वैज्ञानिकांनी अद्याप माहिती दिलेली नाही. परंतु, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांनी तापमानवाढ रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्योटो करार केले आहे. अनेक राष्ट्रांनी या करारावर सह्या केल्या आहेत; परंतु तापमानवाढीसाठी कोणते प्रयत्न करावेत यावर अजून एकमत झालेले नाही.प्रमुख कारणे – अठराव्या शतकापासून नोंदविलेल्या पृथ्वीवरील तापमानाचे विश्लेषण हवामानतज्ज्ञांनी केले असता या तापमानात हळूहळू वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. विशेषत: मागील काही दशकांतील तापमानवाढ पाहिली, तर या वाढीला मानवी कृतीच कारणीभूत असून पृथ्वीच्या नैसर्गिक हरितगृह परिणामाची तीव्रताही मानवी कृतींमुळे वाढली आहे. तसेच या परिणामाला इतर नैसर्गिक घटनादेखील कारणीभूत आहेत. सूर्यप्रकाश, वायू आणि धूलिकण यांच्यातील गुंतागुंतीच्या क्रियांमुळे हा परिणाम घडत असतो. जागतिक तापमानवाढीला जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि वृक्षतोड या दोन प्रमुख बाबी कारणीभूत आहेत. जीवाश्म इंधनांचे बहुतांशी ज्वलन वाहनांमध्ये, उदयोगांमध्ये आणि विद्युतनिर्मिती केंद्रांमध्ये होत असते. या ज्वलनातून कार्बन डाय-ऑक्साइड (CO2) या हरितगृह वायूची निर्मिती होते.जागतिक तापमानवाढीचे होणारे परिणाम हानीकारक असून त्यामुळे सजीवांचे अधिवास धोक्यात येऊ शकतात. नवीन अधिवासाच्या शोधात प्राण्यांचे स्थलांतर होऊ शकते, हवामानाच्या स्वरूपात बदल होऊन पूर आणि हानीकारक वादळे येऊ शकतात, पृथ्वीच्या ध्रुवांवरील बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होऊ शकते आणि सजीवांच्या काही जाती नष्ट होऊ शकतात. याखेरीज जगाच्या विशिष्ट भागात रोगांचा प्रसार, कृषी उत्पादनात घट आणि वाहतुकमार्गांत बदल अशा घटना घडू शकतात. पाण्याच्या वाढत्या तापमानामुळेही समुद्री परिसंस्था देखील धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पृथ्वीवरील तापमान असेच वाढत राहिल्यास, चालू शतकात ग्रीनलंड आणि अंटार्क्टिका येथील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळू शकतो. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत पूरस्थिती निर्माण होऊ शकते, तसेच समुद्राची पातळी वाढल्याने लगतची गावेही पाण्याखाली जाऊ शकतात. यावर उपाय म्हणजे सातत्याने CO2 वायूच्या उत्सर्जनावर मर्यादा घालणे आणि कार्बन जप्ती म्हणजे वातावरण CO2 मुक्त होण्यापासून रोखणे किंवा स्थानिक वातावरणातील CO2 चे प्रमाण कमी करणे. जागतिक तापमानवाढीसंबंधी विविध स्तरांवर सामाजिक, राजकीय तसेच आर्थिक बाबींसंबंधी चर्चा होत आहेत. आयपीसीसी या मंडळाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जागतिक तापमानवाढीचा फटका गरीब राष्ट्रांना आणि त्यातही ज्या देशांचे उत्सर्जन विकसित देशांच्या तुलनेत खूप कमी आहे, अशा राष्ट्रांना बसणार आहे. ऑस्ट्रेलियासारखे विकसित देश क्योटो करारानुसार विकसनशील राष्ट्रांना दिलेल्या सवलतींवर टीका करीत आहेत. पाश्चिमात्य देशांमध्ये विशेषत: यूरोपात, जागतिक तापमानवाढीला मानव जबाबदार आहे, हे पटले आहे आणि तापमानवाढ रोखण्यासाठी हे देश मिळून प्रयत्न करीत आहेत. तापमानवाढ रोखण्यासाठी प्रगत राष्ट्रांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, कारण त्यांच्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे असे काही पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे. पृथ्वीवरील मानव जातीने एकमेकांना सहकार्य केल्यास विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जागतिक तापमानवाढ सहज रोखता येऊ शकते.