विविधतेत एकता शोधणारा सण-होळी!
रंंगाची उधळण करत निसर्ग संकेत देत असतो.होळीचा सण आला.होळी कुणाला आवडत नाही ? सर्वांच्याच जिव्हाळ्याचा हा सण!चला तर मग जाणून घेऊया या सणाबद्दल…

आपला होळी सण संपूर्ण देशात कुठे कोणत्या प्रकारे साजरा केला जातो?
होळी हा भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगांचा एक सण आहे.होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धुळवड,धुलीवंंदन व रंगपंचमी अशी विविध नावे आहेत .काही दिवसांवर होळी हा सण येवून ठेपला आहे.
होळी म्हटली की डोळ्यासमोर सर्वात पहिले येते ती रंगाची उधळण. खरं तर होळी हा सण भारतात सगळीकडेच साजरा करण्यात येतो. वेगवेगळ्या ठिकाणी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने ही होळी साजरी केली जाते. आपल्याकडची पद्धत तर प्रत्येकालाच माहीत असते. पण वेगवेगळ्या प्रांतात होळी साजरी करण्याची पद्धत नक्की कशी आहे याची माहिती तुम्हाला आहे का?
महाराष्ट्र

महाराष्ट्रात घराघरामध्ये पुरणपोळीचा नेवैद्य दाखवला जातो. तर यादिवशी होळीला नारळ अर्पण करून आपल्यावर कोणतेही संकट न येवो यासाठी प्रार्थनाही केली जाते. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला’ धुळवड’ असेही म्हणतात.
एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. खरं तर सर्वांनी एकत्र जमून एकमेकांशी संवाद साधणे हेच कोणत्याही सणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातही याच उद्देशाने ही होळी साजरी करण्यात येते.
महाराष्ट्रात होळी पेटवली जाते,यातून असा अर्थ निघतो की जे वाईट असते ते जळून भस्म होते म्हणून होळी हा सण महाराष्ट्रात साजरा करतांना होळी पेटविल्या नंतर त्यामध्ये वाईट गोष्टी टाकून नष्ट करण्यात येते.
होला मोहल्ला पंजाब
संपूर्ण भारत हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या रंगात भिजत असताना, पंजाबच्या आनंदपूर साहिबमध्ये होला मोहल्ला संपूर्ण उत्साहात साजरा केला जातो. मोहल्ला म्हणजे काय आणि तो कोण साजरा करतो? होला मोहल्ला हा होळीच्या दुसर्या दिवशी पंजाबमधील आनंदपूर साहिब येथे भरलेला मेळा भरतो आणि हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

कोकणातील ‘शिमगोत्सव’
कोकणात होळी या सणाला ‘शिमगा’ असं म्हणतात. शिमगा हा सण कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे सण म्हणजे गणेशोत्सव आणि शिमगा. म्हणूनच गणेशोत्सवानंतर प्रत्येक कोकणी माणूस शिमग्याची आतुरतेने वाट पाहत असतो. कोकणात हे दोन्ही सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. या सणांसाठी सर्वच चाकरमानी आवर्जून गावी जातात. ज्यामुळे या सणांना कोकणातील प्रत्येक घरात उत्सवाचे वातावरण असते. एरव्ही फक्त एक दोन माणसं असलेली कोकणातील घरं सणासुदीला आनंदाने भरून वाहतात. त्यानंतर जवळजवळ आठवडाभर गावोगावी पालखीचा उत्सव साजरा करण्यात येतो. गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानूवर्ष ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणाचाराला येतात असं कोकणात मानल जातं.
