पॉलिटीक्स

अनिल देशमुखांविरूद्धचे आरोप अतिशय गंभीर, तत्काळ राजीनामा द्या! :देवेंद्र फडणवीस

केंद्रीय यंत्रणा वा ‘कोर्ट मॉनिटर्ड’ तपास व्हावा

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी लिहिलेले हे पत्र केवळ खळबळजनक नाही, तर अतिशय धक्कादायक आहे. एखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांमार्फत वा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा आणि अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केली.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, परमबीर सिंग यांनी या पत्रात त्यांनी जो संवाद जोडला आहे, त्यातून स्पष्ट होते की, पैशाची थेट मागणी झालेली आहे. ज्याप्रकारे पोस्टिंग, विशिष्ट अधिकार देणे यासाठी आर्थिक व्यवहार होतात, यातून पोलिस दलाचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होताना दिसते आहे. इतके गंभीर आरोप झाल्यानंतर गृहमंत्री आपल्या पदावर राहूच शकत नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या संपूर्ण आरोपांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करावी. जर केंद्रीय यंत्रणा राज्याला अमान्य असतील, तर न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी झाली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राची मान खाली घालणारा हा प्रसंग आहे. पोलिस दलाची बदनामी करणारा प्रकार आहे. सेवेत असलेल्या महासंचालकांनी लावलेला हा आरोप असून, त्यांच्या पत्रात थेट पुरावा आहे.

हे सुद्धा आणखी गंभीर आहे की, परमबीर सिंग यांनी या पत्रात नमूद केल्यानुसार, हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिला असेल तर त्यांनीं त्याचवेळी कारवाई करायला हवी होती. सरकार वाचविण्यासाठी त्यांनी दुर्लक्ष केले असेल तर असे करून त्यांनी संपूर्ण राज्य धोक्यात टाकण्याचे काम केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी. ती सरकारला मान्य नसेल तर ‘कोर्ट मॉनिटर्ड’ तपास व्हावा. पत्रातील थेट पुरावे लक्षात घेता हे आरोप संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारे आहेत. एकतर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा वा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *