पॉलिटीक्स

सचिन वाझे यांचा राजकीय हँडलर कोण?

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे किंवा मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग हे फार लहान आहेत. त्यामुळे केवळ पोलिस आयुक्तांची बदली करून चालणार नाही, तर सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे किंवा त्यांचे राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केली.

नवी दिल्ली येथे आज भाजपा मुख्यालयात देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रपरिषदेला संबोधित केले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, 2018 मध्ये सचिन वाझे यांना सेवेत घेण्यासाठी माझ्याकडे लोकं पाठविण्यात आली होती. उद्धवजी ठाकरे यांनीही फोन केला होता. काही मंत्र्यांनीही आग्रह धरला. पण, आम्ही त्यावेळी राज्याचे महाधिवक्ते आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा केली आणि कोणत्याही दबावाला बळी पडून त्यांना सेवेत घेतले नाही. मुळात ज्यांचे निलंबन उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाले आहे, त्यांना सेवेत परत घेतलेच कसे, हा यातील कळीचा मुद्दा आहे. सचिन वाझे हे शिवसेनेत होते, प्रवक्ते होते. शिवसेनेतील अनेक नेत्यांसोबत त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. कोरोनाचे कारण दाखवून सचिन वाझे यांना सेवेत घेतले गेले. असे करताना ज्यांना किरकोळ कारणामुळे निलंबित करण्यात आले होते, त्यांना मात्र सेवेत घेतले नाही. सचिन वाझे यांना घेताना थेट क्राईम इंटिलिजन्स युनिटमध्ये नियुक्ती दिली गेली.

सचिन वाझे यांना सीआययू प्रमुख म्हणून नाही तर वसुली अधिकारी म्हणून ठेवले गेले. मुंबईत डान्सबार चालविण्यासाठी खुली सूट आणि सार्‍यांचे प्रमुख सचिन वाझे होते. सार्‍याच महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे देण्यात आला होता. मनसुख हिरेन यांनी गाडी चोरीला गेल्याची जी माहिती दिली, तेव्हा त्यांची तक्रार प्रारंभी घेण्यात येत नव्हती. पण, तेथेही सचिन वाझे यांनी संबंधित पोलिस ठाण्याला फोन करून तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. मनसुख यांची सलग तीन दिवस चौकशी सुद्धा सचिन वाझे यांनीच केली. त्यानंतर त्यांच्याकडून एक तक्रार सुद्धा त्यांनीच लिहून घेतली. मनसुख हिरेन यांची हत्या झाली, असे आमचे म्हणणे आहे. या हत्या प्रकरणात एटीएसकडून ज्या पद्धतीची कारवाई अपेक्षित, तशी होताना दिसून येत नाही. एटीएस आणि एनआयए यांच्याकडे अशा काही टेप्स आहेत, ज्यात वाझे आणि मनसुख यांचे संभाषण आहे. त्यामुळे मनसुख यांच्या हत्येचा तपास सुद्धा एनआयएने घ्यावा, अशी आमची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.

एका गुन्ह्यात संपूर्ण पोलिस यंत्रणा वापरली जाते. पोलिसांच्या माध्यमातून एखादी गाडी ठेवली जाते. मनसुख हिरेन यांची हत्या केली जाते, अशा घटना महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कधीही घडल्या नाहीत. हे पोलिसांचे नाही, तर सरकारचे अपयश आहे. सरकार त्यांचा सभागृहात बचाव करीत होती. ज्या उद्देशाने त्यांना सीआययूमध्ये आणण्यात आले, त्याच्या उद्देशाची सुद्धा चौकशी व्हावी, अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *