बिजनेस बाराखडी (भाग १)
सेन्सेक्स आणि निफ्टी नेमकं काय असत?
मार्केट बाराखडीमध्ये शेयर मार्केट बद्दल लहान मोठ्या गोष्टी समजून घेणार आहोत. यातील पहिल्या भागात आपण सेन्सेक्स आणि निफ्टी समजून घेऊयात
झपाट्याने बदलत असलेल्या जागतिक अर्थ चक्राचा भाग असणे, ते समजू शकणे हे फक्त फायदेशीर नसून आवश्यक देखील आहे. पण नक्की सुरुवात करायची कुठून? रोजच्या बातम्यांमध्ये रेपो रेट, सेन्सेक्स, निफ्टी, फ्युचर्स असे अनेक शब्द आपल्या वाचण्यात येतात पण याचा नेमका अर्थ काय आणि आपल्यावर व आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम काय होतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
व्यवसाय अनेक प्रकारे केला जातो. एखादा व्यक्ती स्वतःचेच कमावलेले,वाचवलेले पैसे भांडवल म्हणून वापरून व्यवसाय करतो. तर एखादा व्यक्ती बँकेकडून कर्ज घेऊन व्यवसाय करतो. ह्याचा तिसरा प्रकार म्हणजे एखादा व्यापारी किंवा उद्योगपती त्याचा व्यवसाय विस्तृत करू इच्छितो आणि त्यासाठी भांडवल उभे करण्याकरता तो त्याच्या कंपनीचे शेअर/ समभाग हे शेअर बाजारात विकायला ठेवतो. “शेअर” म्हणजे त्या कंपनीच्या वित्तीय मालमत्तेच्या मालकीचा एकक/ एक युनिट. असे अनेक युनिट विक्रीस काढल्या जातात. तुम्ही-आम्ही, कोणीही हा शेअर विकत घेऊ शकतो आणि आपण गुंतवलेल्या पैशातून त्या कंपनीचे भांडवल उभे राहते. संभाव्य नफा, नुकसानाचे आपण येणाऱ्या काळात भागीदार होतो.
हा संपूर्ण व्यवहार अमलात आणण्यासाठी “स्टॉक एक्स्चेंज” नावाचा बाजार असतो. इथे सर्व प्रकारच्या सरकारी सिक्युरिटीज, शेअर्स, आर्थिक बोंड, डिबेंचर्स यांचा नियमित व्यवहार होतो. जगभरात असे अनेक स्टॉक एक्सचेंज आहेत. न्यूयॉर्कमधील “न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज” व “नॅसडॅक”, जापान मधील “जपान एक्सचेंज ग्रुप”, लंडनचे” लंडन स्टॉक एक्स्चेंज” हे काही मुख्य नावे आहेत. भारतात असे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत, BSE LTD (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (NSE).
BSE आणि NSE काय आहे याआधी इंडेक्स काय असतो ते समजून घेणे आवश्यक आहे. इंडेक्स हाएक निर्देशांक असतो जो किमतींमध्ये होणाऱ्या बदलांचे मापन करतो. हा निर्देशांक प्रत्येक स्टॉक एक्सचेंज च्या एकूण व्यवहारावर अवलंबून असतो. प्रत्येक स्टॉक एक्सचेंज मध्ये निर्देशांक मोजण्याचे विशिष्ट प्रमाण, शेअर बाजाराचे नियम वेगळे असतात.
BSE
BSE लिमिटेड किंवा पूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखला जाणारा हा १८७५ साली स्थापित झालेला आशिया खंडातील सर्वात पहिला स्टॉक एक्सचेंज आहे. हा जगातील सातवा सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज असून याचे फेब्रुवारी २०२१ चे संपूर्ण मार्केट कॅपिटलाईजेशन २.८ ट्रिलियन अमेरिकन डॉलर आहे. अर्थात या एक्सचेंजमध्ये २.८ ट्रिलियन डॉलर एवढा व्यवहार नोंदवला जातो.
या स्टॉक एक्सचेंजचे वैशिष्ट्य असे आहे याची सुरुवात मुंबईतील दलाल स्ट्रीट वरील एका वडाच्या झाडाखाली झाली होती. प्रत्यक्ष जमून स्टॉकची खरेदी-विक्री करण्यापासून ते आज ६ माइक्रो सेकंदची ट्रेडिंग स्पीड नोंदवण्यापर्यंतचा हा विस्तार झाला आणि आज इथे रोज कोट्यावधींची उलाढाल होते.
BSE वरील व्यवहार हा इतर कोणत्याही एक्सचेंज प्रमाणे होतो. सर्वप्रथम त्या कंपन्या ज्यांना या बाजारातून भांडवल उभे करायचे आहे त्या स्वतःचा आयपीओ (IPO) आणून स्वतःचे नाव नोंदवतात. आयपीओ किंवा इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे शेअर्सचा सर्वप्रथम विकला जाणारा हिस्सा. गुंतवणूकदार आणि व्यापारी ब्रोकर चा मदतीने किंवा स्वतः च एक्सचेंज मधून शेअर खरेदी करतात आणि गरज भासेल तसे विकतात. पण कोणता शेअर घ्यायचा कोणता शेअर विकायचा हे कसे ठरते?
BSE मध्ये ५००० पेक्षा जास्त कंपन्या नोंदवलेल्या आहेत. BSE चा इंडेक्स/ निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स. सेंसिटिव इंडेक्स असे दोन शब्द मिळून सेन्सेक्स हा शब्द तयार झाला. हा सेन्सेक्स शेअर्सची एकूण परिस्थिती समजण्यास मदत करतो.BSE ने ३० ठराविक स्टॉक / कंपन्या निवडलेल्या आहेत . यांची बाजारात प्रतिष्ठा, एकूण व्यवहार (मार्केट कॅपिटलायझेशन) आणि त्यांच्या संबंधित होणारा घडामोडींवरून या निर्देशांकाची गणना होते. जर एखाद्या कंपनीचा स्टॉक वधारला तर सेन्सेक्स चे मूल्य देखील वाढते.
NSE
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया हा १९९२ साली, शेअर बाजारात अधिक पारदर्शकता यावी यासाठी भारतीय बाजारात समाविष्ट झाला. देशातील पहिला “डीमटेरियलाईज्ड इलेक्ट्रॉनिक एक्स्चेंज” म्हणजे NSE.
आधी शेअर विक्री खरेदी प्रामुख्याने ब्रोकर द्वारा आणि कागदोपत्री होत असे. यामुळे फक्त एक विशिष्ट गटा व्यवहारात सक्रिय होता. आणि तांत्रिक बारकावे न समजणारे सर्वसामान्य लोक अनेक वेळा फसवलेही जायचे. ही फसवेगिरी थांबवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेची शेअर ट्रेडिंग मध्ये गतिशीलता वाढवण्यासाठी हा “डीमटेरियलाईझेशनचा” पायंडा पाडण्यात आला. आज आपण शेअर ट्रेडिंग साठी जे डिमॅट अकाउंट काढतो ते “डिमेट” नाव डीमटेरियलाईझेशन पासून आले आहे.
NSE हा जगातील अकरावा सर्वात मोठा एक्सचेंज आहे. NSE चे मार्केट कॅपिटलाईजेशन २.२७ त्ट्रिलियन डॉलर एवढे आहे. यामध्ये १६०० पेक्षा जास्त कंपन्या नोंदवलेल्या आहेत. यापैकी 50 स्टॉक /कंपन्या निवडून NSE चा निर्देशांक काढल्या जातो. या इंडेक्स ला निफ्टी50 असे नाव दिले आहे BSE प्रमाणेच इथेही या 50 कंपन्यांच्या कामगिरीवर निर्देशांकाचे मूल्य ठरते.
या सर्वाचा अभ्यास करून कोणीही आज शेअर बाजारात उतरु शकतो. स्टॉक व्यतिरिक्त म्युचल फंड, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असे अनेक गुंतवणुकीचे पर्याय आज उपलब्ध आहेत. वॉरेन बफेट यांनी असे म्हटले आहे ” कधी एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका. गुंतवणूक करून दुसरा स्त्रोत तयार करा.” तर आता जागतिक अर्थचक्राचा भाग होण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.
जानव्ही दैठणकर