कोरोनाबाधित एसटी कर्मचा-यांना मिळणार वैद्यकिय उपचाराचा खर्च
सप्टेंबर 2020 पासून खर्चाची प्रतिपूर्ति देणार
कोरोनाची लागण झाली आहे, अशा एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचा-यांनाही आता वैद्यकिय उपचाराचा खर्च मिळणार आहे. 2 सप्टेंबर 2020 पासून वैद्यकिय उपचारासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
सरकारी कर्मचा-यांच्या विविध आजारांच्या उपचारांसाठी होणा-या वैद्यकिय खर्चाची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाते. अशा विविध 27 आकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या आजाराचा नुकताच समावेश करण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार वैद्यकिय प्रतिपूर्तीसाठी वेळोवेळी केलेले बदल हे राज्य परिवहन महामंडळासाठीही लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय कोविडचा संसर्ग होऊन आजारी पडल्यास त्यासाठी होणा-या वैद्यकिय खर्चाची प्रतिपूर्ती महामंडळाकडून देण्यात येणार आहे. हा निर्णय 2 सप्टेंबर 2020 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील. या संदर्भातील परिपत्रक कर्मचारी वर्गाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांनी जारी केले आहे.